
कासवांची तस्करी करून विक्री करणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
वडगाव मावळ : कासवांची तस्करी करून विक्री करणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. कासवाच्या तस्करीसाठी लाखों रुपयांची उलाढाल होते. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे येथे ही कारवाई करण्यात आली.
राकेश आबाजी पवार (वय ३७ रा. कामशेत ता.मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून बारा नख्यांचे दोन कासव असे एकूण ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले कासव वनपरिक्षेत्र विभागाकडे सोपविण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार, फरार आरोपींचा शोध मोहीमेवर असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना कान्हो फाटा येथे कासवाची तस्करी करून विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तोडगे, सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार प्राण येवले, काशिनाथ राजपुरे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.