Fraud

पुणे येथील एका खाजगी फायनान्स कंपनीने १ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून महागाव (ता. गडहिंग्लज) येथील मोहनसिंग राजपूत या तरुणाची तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कर्ज मंजुरीचे पत्र दिल्यानंतर प्रत्यक्षात ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आल्याने राजपूत कुटुंबीय हादरून गेले आहे.

    आजरा : पुणे येथील एका खाजगी फायनान्स कंपनीने (Finance Company) १ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून (Fake Loan Promise) महागाव (ता. गडहिंग्लज) येथील मोहनसिंग राजपूत या तरुणाची तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कर्ज मंजुरीचे पत्र दिल्यानंतर प्रत्यक्षात ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आल्याने राजपूत कुटुंबीय हादरून गेले आहे.
    याप्रकरणी बोरवडे येथील मध्यस्थी करणारा एकजण अद्यापही या कुटुंबियांना भेटू शकला नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, महागाव येथील राजपूत यांना एक कोटी साठ लाख रुपयांचे कर्ज व्यवसायासाठी पुणे येथील एका खाजगी फायनान्स कंपनीकडून उपलब्ध करून देतो असे सांगितले. व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत असल्याने मध्यस्थाला कमिशन देण्याचेही मान्य करण्यात आले. मालमत्ता तारण देऊन सदर कर्ज दिले जाणार असल्याचे सुरुवातीस सांगण्यात आले. तारण  कागदपत्रांसाठी वकील फी, सर्च रिपोर्ट फी, स्टॅम्प,प्रोसेसिंग फी यासाठी रुपये १ लाख ८० हजार इतकी रक्कम राजपूत यांच्याकडून घेण्यात आली.
    कर्ज मंजुरीचे कंपनीचे रितसर पत्रही त्यांना देण्यात आले. एक लाख ८० हजार रुपये पोहोच झाल्यानंतर मात्र मध्यस्थाने राजपूत यांना टाळण्यास सुरुवात केली. राजपूत यांनी बोरवडे येथे संबंधित मध्यस्थाच्या भेटीकरीता वेळोवेळी प्रयत्न केला. पण तो बाहेरगावी असल्याचे सांगून भेट टाळत आला. अखेर कंपनीच्या पुणे येथील मंजुरी पत्रावर असलेल्या पत्त्यावर जाऊन राजपूत कुटुंबीयानी शहानिशा केली असता तेथे अशी कोणतीही फायनान्स कंपनी अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
    ज्या खात्यावर त्यांनी एक लाख ८० हजार रुपयांचा भरणा केला होता, त्या बँक खात्यावरील शिल्लकीची चौकशी केली असता एक रुपया ८९ पैसे इतकी रक्कम खात्यावर शिल्लक असल्याचे आढळून आले. कर्ज तर नाहीच पण पदरचे १ लाख ८० हजार गमावण्याची वेळ संबंधित तरुणावर आली.