
कातरखटाव-वडूज रस्त्यावर बुरुंगले वस्तीनजीक ऊसाने भरलेली एक ट्रॉली व ट्रॅक्टर पुलावरून खाली तर एक ट्रॉली पुलावर अडकल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याची घटना घडली.
वडूज : कातरखटाव-वडूज रस्त्यावर बुरुंगले वस्तीनजीक ऊसाने भरलेली एक ट्रॉली व ट्रॅक्टर पुलावरून खाली तर एक ट्रॉली पुलावर अडकल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सर्वच कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने सर्वत्र ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पडळच्या खटाव-माण ॲग्रो कारखान्यात गाळप करण्यासाठी जिल्हा भरातून ऊसाची वाहतूक सुरु आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान वडूजकडून कातरखटावमार्गे पडळ कारखान्याकडे निघालेला (एममच 11 बीए 4615) हा ट्रॅक्टर दोन ऊसाच्या ट्रॉल्या घेऊन बुरुंगले वस्तीनजीक आला असता ओढ्यावरील पुलावरुन एका ट्रॉलीसह खाली पडला. तर एक ट्रॉली पुलावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला.
सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी ट्रॅक्टर व ट्रॉलीचे नुकसान झाले आहे. एक ट्रॉली पुलावर अडकल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. ओढ्यावरील पुलाची उंची कमी व पूल अरुंद असल्याने येथे वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे संबंधित विभागाने पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांनी केली आहे.