भरधाव वाहनाने मनोरुग्ण महिलेला चिरडले; पातूर-अकोला मार्गावर अपघाताचे सत्र थांबता थांबेना

एका मनोरुग्ण महिलेला अकोला ते पातूर मार्गावर एका अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी नांदखेड फाट्याजवळ घडली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू (Accident in Alegaon) झाला.

    आलेगाव : एका मनोरुग्ण महिलेला अकोला ते पातूर मार्गावर एका अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी नांदखेड फाट्याजवळ घडली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू (Accident in Alegaon) झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात चिरडल्या गेलेल्या महिलेची ओळख पटविणे सुद्धा कठीण आहे.

    अपघाताची माहिती पातूरचे ठाणेदार किशोर शेळके यांना मिळताच आपल्या ताफ्यासह ते घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. या अपघातासाठी जबाबदार असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही महिला वेडसर असल्याची माहिती समोर आली आहे. पातूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या महामार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अपघात घडले असून, एकाच जागेवर चौथ्यांदा अपघात 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास पातूर घाटात ट्रक उलटला होता.

    यापूर्वी 18 एप्रिल रोजी याच जागी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली होती. 14 जून रोजी याच ठिकाणी निजामाबाद ते राजस्थान बिडी बंडल घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याच्या लागोपाठ जुलै महिन्यातदेखील याच जागेवर एक आणखी ट्रक पलटी झाला होता. त्याच जागेवर आजचा अपघात झाला आहे. येथे अपघातप्रवण स्थळाचे फलक लावण्याची गरज आहे. महिनाभरात अकोला-पातूर रोडवर उड्डाण पुलाजवळ एक दाम्पत्य जागीच ठार झाले होते.