गव्याच्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

गव्याचा हल्ल्यात करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील सौरभ संभाजी खोत (वय २१, रा. भुयेवाडी) तरुण ठार झाला. यात प्रल्हाद उर्फ लाला पाटील यांच्या दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.  

    कोल्हापूर : गव्याचा हल्ल्यात करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील सौरभ संभाजी खोत (वय २१, रा. भुयेवाडी) तरुण ठार झाला. यात प्रल्हाद उर्फ लाला पाटील यांच्या दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

    मयत सौरभ हा माजी सरपंच पूजा खोत यांचा तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संभाजी खोत यांचा एकुलता एक मुलगा होता. गव्याचा वावर गेले तीन दिवस कोल्हापूर शहराच्या परिसरात आहे. गुरुवारी रात्री गवा लक्षतीर्थ वसाहतीत होता, तर काल शुक्रवारी पंचगंगा नदी परिसरात गव्याचा वावर होता. काल गव्याने दिवसभर जामदार क्लब येथील महादेव मंदिराच्या पिछाडीस गवताच्या रानात ठाण मांडले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास गवा परतला होता. शिवाजी पुलावरून तो वडणगेतील पवार पाणंदकडे गेला होता. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता.

    भरकटलेला गवा भुयेवाडी, भुये परिसरात आला होता. शनिवारी रात्री या परिसरात आलेल्या गव्याच्या पाठीमागे गावातील तरुण हुसकावण्यासाठी बॅटरी घेऊन गेले होते. मात्र गव्याने आपले तोंड मागे करून या तरुणावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या पोटामध्ये शिंगे मारल्याने तो जागीच गतप्राण झाला.

    सतर्क राहण्याचे आवाहन

    भुयेवाडी गाव शिवारातून गवा पुन्हा पोहाळे मार्गे जोतिबा डोंगराचे दिशेने गेला. पण परत रात्री गवा पुन्हा कोल्हापूर शहरात परतला असल्याने शहरवासीयांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाची रेस्क्यू टीम त्याचा पाठलाग करत आहे. ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.