भीमानगर येथे भीषण अपघात; ट्रक-टँकरची धडक; चारजण जागीच ठार, चौघे गंभीर

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मळीचा टँकर व तांदूळ घेऊन निघालेल्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन (Accident in Bhimanagar) चार जण जागीच ठार झाले. तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले.

    माढा : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur-Pune National Highway) मळीचा टँकर व तांदूळ घेऊन निघालेल्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन (Accident in Bhimanagar) चारजण जागीच ठार झाले. तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि.२७) रात्री ११. ३० च्या सुमारास भीमानगर (ता.माढा) येथील सरदारजी ढाब्यासमोर हा भीषण अपघात झाला. मृत आणि जखमींची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती.

    भीमानगर येथील उजनी कालव्याच्या पुढे ५०० मीटरवर सरदारजी ढाबा आहे. एका बाजूने महामार्गाचे दुरुस्ती काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक चालू होती. मळी भरलेला टँकर (एमएच १४ सीपी ४०२०) हा पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. तांदूळ घेऊन भरलेला ट्रक (एमएच २५ यू ४०४५) सोलापूरहून पुण्याचा दिशेने निघाला होता. ढाब्यासमोर या दोन्ही वाहनांची धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांतील प्रत्येकी दोन पुरुषांचा मृत्यू झाला. तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

    मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम चालू असूनही संबंधित विभागाने दिशादर्शक फलक लावले नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.