सोलापुरातील मोहोळ तालुक्यात अपघात; मालट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार

सायकलवरून निघालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये सायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी (दि.25) दुपारी साडेबाराच्या सुमारास मोहोळ कुरूल रस्त्यावरील अष्टविनायक दूध डेअरी समोर झाला.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सायकलवरून निघालेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये (Accident in Mohol) सायकलस्वार जागीच ठार (Cyclist killed in Accident) झाला. हा अपघात गुरुवारी (दि.25) दुपारी साडेबाराच्या सुमारास मोहोळ कुरूल रस्त्यावरील अष्टविनायक दूध डेअरी समोर झाला.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब दत्तू अवताडे (वय ५५ रा. क्रांतीनगर मोहोळ) हे त्याठिकाणी कुटुंबासमवेत राहून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी घराकडून मोहोळ शहराकडे भाऊसाहेब अवताडे सायकलवरून येत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान कुरुलकडून मोहोळकडे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालट्रक (एमएच १२ एचडी २२०७) ने सायकलला जोराची धडक दिली. त्यामध्ये अवताडे यांना गंभीर मार लागून ते जागीच ठार झाले.

    याप्रकरणी ट्रकचालक आकाश बिरू पांढरमिसे (रा. शिरापूर ता. मोहोळ) याच्याविरोधात मृत भाऊसाहेब आवताडे यांचा मुलगा प्रकाश याने फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी चालक पांढरमिसे याच्याविरोधात वाहन वेगात चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.