बार्शीजवळ भीषण अपघात; खासगी बस-ट्रॅक्टरची जोरदार धडक, दोघे ठार; १२ जखमी

बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर खासगी बस आणि ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार; तर १२ जण जखमी झाले.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर खासगी बस आणि ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार; तर १२ जण जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

    ऐन पहाटेच्या दरम्यान हा अपघात घडला. तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. शनिवारी रात्री उशिरा पुणे येथून लातूरकडे खासगी बस निघाली होती. पहाटे साडेचारच्या सुमारास तिरकस पूल येथे बार्शीहून ऊसाचा ट्रॅक्टर निघाला होता. ही दोन्ही वाहने तिरकस पुलावर समोरासमोर आली असता जोराची धडक झाली.

    यात खासगी बसचालक सिद्धार्थ अनिल शिंदे (वय २७ रा. वसवडी, जि.लातूर) व शेजारी बसलेले मनोज शिवाजी विद्याधर (रा. बोधनगर, लातूर) हे जागीच ठार झाले. तर बसमधील १२ प्रवासी जखमी झाले. त्यांना बार्शीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.