सुर्याचीवाडीजवळ भीषण अपघात; चौघे जखमी, गाडीचा चक्काचूर

कातरखटावच्या बाजूने मायणीच्या दिशेने निघालेली चारचाकी कार (एमएच ४२ एएस ३९०३) व मायणीकडून कातरखटावच्या दिशेने निघालेला टँकर (एमएच ४२ एक्यू ७०१९) या दोन्ही वाहनांत सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक झाली.

    वडूज : मिरज-भिगवण राज्यमार्गावरील सुर्याचीवाडी (ता.खटाव) गावच्या हद्दीत दोन चारचाकी वाहनांच्या अपघातात चार जण जखमी (Accident in Vaduj) झाले. कातरखटावच्या बाजूने मायणीच्या दिशेने निघालेली चारचाकी कार (एमएच ४२ एएस ३९०३) व मायणीकडून कातरखटावच्या दिशेने निघालेला टँकर (एमएच ४२ एक्यू ७०१९) या दोन्ही वाहनांत सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक झाली.

    त्यामध्ये चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. जोरदार धडकेमुळे चारचाकीचे इंजिन, पुढील चाके व अन्य भाग सुमारे पन्नास ते शंभर फूट अंतरावर दूरवर तुटून पडले होते. तर चारचाकीने पुन्हा कातरखटावकडे तोंड फिरविले होते. टँकरही रस्ता सोडून उजव्या बाजूला एका शेतात पन्नास फूट अंतरावर गेला होता. अपघाताच्या आवाजाने नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली.

    तसेच पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चारचाकीतील अपघातग्रस्त बारामती (जि.पुणे) येथील असल्याचे समजते. त्यांना उपचारासाठी बारामतीला नेल्याचे समजते. त्यामुळे अपघातासंबंधी अन्य तपशील मिळू शकला नाही.