सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पिता-पुत्र ठार, गाडीचा चक्काचूर

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वडाचीवाडी हद्दीत सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या इको कारने जोरदार धडक दिली.

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वडाचीवाडी हद्दीत सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या इको कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र असे दोघेजण ठार तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.१९) सकाळी सहाच्या दरम्यान घडली.

    याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, इको कार (क्र. एमएच ०४ डीके १११३) मधून देवदर्शनासाठी मुंबई येथून तुळजापूरकडे दिपक दगडू उबाळे, यासह यांचा मुलगा राहुल दिपक उबाळे (दोघेही रा. चेंबूर, मुंबई), अमोल दिपक पवार (रा. मरळ, मुंबई) व सुखदेव गजानन शिंदे (रा. आंबेवाडी ठाणे) असे चार जण निघाले होते. दरम्यान, त्यांची इको कार मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीत आली असता निलकमल हॉटेल समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालट्रक (एमएच ११ एएल ७१४९) ला पाठीमागून जाऊन जोरात धडकली. यामध्ये दीपक दगडू उबाळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा राहुल दीपक उबाळे (वय २६) यांचा उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या अमोल दिपक पवार (वय २६) यांची प्रकृती चिंताजनक असून, चालक शिंदे हेही जखमी आहेत.

    अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल नाक्याच्या पेट्रोलिंग पथकाने जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सोलापूर येथे पाठवले. देवदर्शनासाठी निघालेल्या उबाळे पिता-पुत्रांच्या या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या या अपघाताची खबर सावळेश्वर टोल नाक्याच्या पथकाचे अमर डोंबे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.