तमाशा कलावंतांच्या गाडीला अपघात; कासच्या जंगलातील घटनेत ५ जखमी

गावच्या यात्रेत करमणुकीचा कार्यक्रम उरकून परत निघालेल्या तमाशा कलावंतांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात पाचजण जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.

  सातारा : गावच्या यात्रेत करमणुकीचा कार्यक्रम उरकून परत निघालेल्या तमाशा कलावंतांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात पाचजण जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात (Satara District Hospital) दाखल करण्यात आले.

  सध्या बामणोली व तापोळा भागात ग्रामदेतांच्या यात्रांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे काही यात्रांमध्ये कोरोना नियमावली पाळून सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये तमाशा, नाटक, ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे व वेंगळे या ठिकाणी तमाशा कार्यक्रम आटोपून परत कराडकडे परतत असताना अंधारी, ता. जावली गावच्या हद्दीत कासच्या घनदाट जंगलात एस वळणाच्या उतारावर कमल कराडकर यांच्या तमाशा कलावंतांच्या आयशर टेम्पोला बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला.

  गाडीत एकूण १५ ते २० कलाकार होते. त्यापैकी ५ जखमी कलाकारांना तत्काळ बामणोली आरोग्य केंद्राच्या १०८ रुग्णवाहिकेने रात्रीच सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती बामणोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी दिली.

  ब्रेक न लागल्याने अपघात

  घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तमाशा कलाकार गोगवे, वेंगळे या भागातील कार्यक्रम आटोपून परत कराडच्या दिशेने परतत होते. अंधारी गावच्या वर एस वळणाच्या वरील बाजूला आल्यावर गाडीतील डिझेल संपल्याने ड्रायव्हरने गाडी उताराच्या वरील बाजूस लावली. त्यानंतर त्यांनी बामणोली येथे जाऊन डिझेल आणले.

  डिझेल गाडीत टाकून परत कराडकडे जाणार होते. ड्रायव्हरने गाडी चालू करून सर्वजण जायला निघणार मात्र मागे तीव्र उतार असल्याने ड्रायव्हरला गाडीचा ब्रेक न लागल्याने त्यात गिअर देखील व्यवस्थित न पडल्याने उलट दिशेने गाडी मागे येऊन घनदाट जंगलात शिरली. या अपघातातील ५ जखमींना १०८ रुग्णवाहिणकेने तात्काळ जिल्हा रुग्णालयात सातारा येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.