तीन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लिपिकासह दोघांवर कारवाई

विवाहाची नोंदणी करून दाखला देण्यासाठी ३ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या कनिष्ठ लिपिकासह दोघांवर आज (बुधवार) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Action in Kolhapur) सापळा लावून कारवाई केली.

    हातकणंगले : विवाहाची नोंदणी करून दाखला देण्यासाठी ३ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या कनिष्ठ लिपिकासह दोघांवर आज (बुधवार) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Action in Kolhapur) सापळा लावून कारवाई केली.

    सुधीर अमितचंद चौधरी (वय ४५, कनिष्ठ लिपिक, हातकणंगले ग्रामीण रुग्णालय, रा. रुक्मिणी हौसिंग सोसायटी, संजयनगर, सांगली) व खासगी व्यक्ती सचिन शिवाजी भोसले (रा. नेज, ता. हातकणंगले), सौरभ अरविंद नर्ले (रा. नेज, ता. हातकणंगले ) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

    याबाबत अधिक माहिती अशी की, हातकणंगले येथील तक्रारदार यांच्या विवाहाची नोंदणी करून दाखला देण्यासाठी कनिष्ठ लिपिक सुनील चौधरी व सचिन भोसले यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर सचिन भोसले याने सदरची लाचेची रक्कम सौरभ नर्ले याच्याकडे देण्यास सांगितले. दरम्यान, आज सौरभ नर्ले याला ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.