विरारमध्ये गावठी दारू अड्डयावर कारवाई; हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

विरार पूर्वेच्या बरफपाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या अवैध दारूच्या हातभट्टीवर विरार पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    विरार : विरार पूर्वेच्या बरफपाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या अवैध दारूच्या हातभट्टीवर विरार पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विरार पूर्वेचा बरफपाडा हा परिसर चाळ वस्तीचा असून या भागातील जंगल भागात गावठी दारू बनवण्याची भट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती विरार पोलिसांना मिळाली होती.
    ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी, शिपाई चेतन निंबाळकर, इंद्रसिंग पाडवी व मसुब ऋषिकेश गवळी यांनी दारूच्या अड्डयावर धाड टाकून कारवाई केली. यावेळी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य व दारू असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे.
    वसई विरार परिसरातील शहरी भागासह ग्रामीण भागात गावठी दारू बनविण्याचे अड्डे आहेत. ही दारू बनविण्यासाठी काळा गूळ (साखरेत सडविलेला) व नवसागर महत्वाची सामग्री आहे. जेवणात वापरल्या जाणाऱ्या गुळाला एका जागी साखरेचा वापर करून सडविले जाते, त्यानंतर हा गूळ दारू साठी वापरण्यात येतो. वसई तालुक्यात काही व्यावसायिक या काळ्या गूळाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यांच्याद्वारे गूळ भट्ट्यांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे पोलिसांनी गूळ व्यावसायिकांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.