आदित्य ठाकरे नासमज, राज्याबाहेर उद्योग जाण्यास आधीचे सरकार जबाबदार ; महसूलमंत्री विखेंची टीका 

  अहमदनगर : वेदांता उद्योग (Vedant Foxconn Plant)गुजराथमधे गेल्याबद्दल टीका करणारे शिवसेनेचे युवानेत आदित्य ठाकरे यांनी नानार रिफायनरी प्रकल्प दुसऱ्या राज्यात का गेला याची माहिती घ्यावी तसेच वेदांता बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnvis)यांनी याबद्दल माध्यमांना अवगत केले आहे, असे सांगत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नवीन आणि नासमज आहेत. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात राज्यातील नानार सारखे उद्योग त्यांच्याच नेत्यांमुळे गेलेत हे माहिती करून घ्यावे. हा प्रकार म्हणजे उगाच चोराच्या उलट्या बोंबा मारून पोरकटपणा करण्यासारखे असल्याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Vikhe Patil) यांनी केली आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्याचा शुभारंभ नगर इथे विखे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. यावेळी माजीमंत्री शिवाजी कर्डीले, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे आदी उपस्थित होते.

  भविष्यात वेदांता राज्यात गुजरात पेक्षा अधिक रोजगार देणार

  वेदांता उद्योग राज्याबाहेर गेला हे खरे असले तरी उद्योग समूहाने भविष्यात पूरक प्रकल्प हे राज्यात होणार असून त्यातील गुंतवणूक ही गुजरात पेक्षा मोठी राहून रोजगारही जास्त असणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कबूल केले आहे. मुळात वेदांता, नानार सारखे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास पूर्वीचे ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विखे यांनी केला. उद्योग बाहेर जाण्यामागे टक्केवारी कारणीभूत आहे का हे भविष्यात पुढे येईलच असेही ते म्हणाले.

  काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते वैफल्यग्रस्त

  काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सध्याचे सरकार आहे. कुठे असा आरोप करत  सरकार, मंत्रिमंडळ स्थापनेला उशीर केल्यानंतर अजून पालकमंत्री नेमले नसल्याबद्दल शुक्रवारी नगरमध्ये टीका केली होती. यावर विखे यांना छेडले असता, अचानक अस्तित्व गमावून बसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते वैफल्यग्रस्तपणे बोलत असून आपण त्यांच्या बोलण्याला फार महत्व देत नसल्याचे सांगितले.

  लंपी आजाराबाबत शासनाची सर्वोतोपरी मदत

  लंपी आजाराबाबत राज्यसरकार आणि आपण पशुसंवर्धन मंत्री म्हणून तातडीने अनेक निर्णय घेतल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. १०० टक्के लसीकरण, मोफत औषधउपचार केले जात असून तातडीने एक हजार पशु पर्यवेक्षक नेमले जात असल्याचे तसेच खाजगी पशु वैद्यकीय डॉक्टरांची मदत घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मृत जनावरांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई म्हणून गाईसाठी ३५ हजार, बैलासाठी २५ हजार आणि वासरासाठी १६ हजार मदती सोबत जिल्हापरिषदेकडून प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह मदत दिली जाणार असल्याची माहिती विखे यांनी दिली.