म्हसवडकरांच्या‌ आक्रमकतेपुढे प्रशासन नरमले

    म्हसवड : ओमिक्रोन या नव्या विषाणू कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे यंदाही रथ मिरवणूकीसह यात्रा भरविण्यास प्रशासनाने प्रतिबंद केल्याच्या निषेधार्थ येथील ग्रामस्थ, मानकरी व भाविकांनी माण तालुक्यातील प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात म्हसवड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाने नागरिक व भाविकांसोबत चर्चा करुन सांमजस्याची व लवचिक भूमिका घेत काही फक्त स्थानिक भाविकांनाच काही अटी शर्तीवर रिंगावन पेठ मैदानात रथप्रदक्षिणा करण्यास तोंडी सशर्त परवानगी दिल्याने म्हसवडकरांच्या एकीपुढे प्रशासन नरमले असल्याचे दिसून आले.

    येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थित प्रत्येक वर्षी केली जाते.

    यंदा रविवारी देवदिवाळीस रथ मिरवणूकीने करण्याची परंपरा आहे. परंतू ओमिक्रोन (कोरोना) विषाणूच्या वाढत्या प्रादु्र्भावच्या संकटामुळे यंदाही रथ मिरवणूक नगरप्रदक्षीणा होणार की नाही, याबाबत प्रशासनाच्या आढमुठ्या भूमिकेमुळे संमभ्रमावस्था निर्माण झाली होती. यामुळे म्हसवडकर नागरीकांतुन, भाविकांतुन व व्यापारीवर्गातुन तीव्र संताप व्यक्त होत होता.

    प्रशासनाच्या निषेधार्थ येथील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येत आज शनिवारी म्हसवड बंद करुन प्रशासन रथ मिरवणुकीस जोवर परवानगी देत नाही तोवर सोलापूर-सातारा महामार्गावर रस्तारोको करण्याचा निर्णय घेतला होता. पण याची कुणकुण प्रशासनाला लागताच आज शनिवारी सकाळीच प्रशासनातील अनेक अधिकारी म्हसवडमध्ये दाखल होऊन येथील ग्रामस्थांबरोबर रिंगावण पेठ मैदानात सकारात्मक चर्चा करुन प्रशासनाने रथोत्सवासाठी रिंगावण पेठ मैदानात रथाची प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मान्यता दिल्याने आजचा बंद व रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

    यावेळी म्हसवड शहरातील ग्रामस्थ, भाविक, मानकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रींच्या रथाच्या प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा निर्णय झाल्यावर रथाची स्वच्छता करण्यात आली.

    म्हसवड शहराला पोलीस छावणीचे स्वरुप 

    म्हसवड शहरातील सिध्दनाथ यात्रा जरी प्रशासनाने रद्द केली असली तरी म्हसवड शहरात बाहेरुन ‌भाविक येवु नयेत यासाठी पोलीसांनी शहरात येणार्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस छावणी उभारली ‌आहे, तर शहरातील अंतर्गत रस्तेही बैरी गेट लावुन बंद केली आहेत, शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले‌ आहे.