सिध्दनाथाच्या रथोत्सवास प्रशासनाची आडकाठी; रथाची नगरप्रदक्षणाही केली रद्द

    म्हसवड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव ५ डिसेबंर रोजी संपन्न होणार होता. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाई व आडमुठ्या धोरणामुळे यंदाचा हा रथोत्सवास रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर करीत ठरलेली रथाची नगरप्रदक्षणाही रद्द केली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात म्हसवडकर नागरीकांतुन, भाविकांतुन व व्यापारीवर्गातुन तीव्र संताप व्यक्त होत असुन प्रशासनाच्या निषेधाचे मेसेज सोशल मीडीयावर मोठ्या‌ प्रमाणावर व्हायरल झाले‌ आहेत.

    म्हसवड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव यंदा होणार अशी चर्चा शहरात गत महिन्यात सुरु झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने म्हसवड शहरात प्रांताधिकऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत जिल्हाधिकारीच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील असे कळवण्यात आले. त्यानंतर पालिका, मानकरी यांनी प्रशासनाला हमीपत्रही दिले तर पालिकेने यात्रा भरवण्यास सकारात्मकता दाखवत त्यादृष्टीने शहरात साफ सफाई सुरु केली.

    रथमार्गावरील अडथळेही जेसीबीच्या साह्याने दुर करण्याच्या कामास वेग दिला तर नगराध्यक्षांसह शहरातील काही प्रमुख नागरीकांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकार्यांना ही भेटले यावेळी जिल्हाधिकार्यांनी म्हसवड सिध्दनाथ यात्रेबाबत आपणही सकारात्मक असल्याचे सांगत प्रांताधिकार्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले. तर जिल्हाधिकार्यांनी सकारात्मकता दर्शिवल्यामुळे म्हसवडकर नागरिक व व्यापारी वर्ग आनंदीत झाले होते, त्यामुळे यंदा रथोत्सवास होणार असे बोलले जात असतानाच प्रांताधिकार्यांनी फक्त मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दहिवडी येथे एक बैठक घेत यात्रेला नकार दिला मात्र त्याचवेळी फक्त श्रींच्या रथाची नगरप्रदक्षणा काढण्यात काही अटींवर परवानगी दिली.

    यावेळी रथ ओढणाऱ्या २०० नागरीकांचे दोन्ही लस झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे, सर्वांचे आधारकार्ड जमा करणे आदी अटी प्रांताधिकार्यांनी घातल्या होत्या त्या सर्व अटी मान्य करीत येथील भाविक व नागरीकांनी अटींची पुर्तता केली तर येथील मुख्य राजे मानकर्यांनी शहरातील इतर मानकरी लोहार, सुतार, व माळी आदींना बोलावुन श्रींचा रथ रथगृहाबाहेर काढुन त्याच्या चाकाला लोखंडी रिंग (धाव) मारण्याचे काम सुरु केले होते. यामुळे शहरात यात्रा भरणार नसली तरी श्रींचा रथोत्सव तरी यंदा होत आहे. यामध्ये सर्व म्हसवडकर जनतेने, भाविकांनी व व्यापारी वर्गाने समाधान मानले होते. मात्र, अचानक पुन्हा प्रशासनाने आपली भूमिका बदलत श्रींच्या रथाच्या नगरप्रदक्षणेलाही लाल झेडा दाखवत श्रींच्या रथाच्या नगरप्रदक्षणेबाबत आडकाठी घेतली आहे.