सांत्वनासाठी गेल्यानंतर राजकीय चर्चा नसते आणि आमची ती संस्कृती नाही : जयंत पाटील

आरोग्य मंत्री राजेश टोपे हे इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचं निधन झाल्याने सांत्वनासाठी गेले होते अशावेळी राजकीय चर्चा करणे अभिप्रेत नाही. आमची तशी संस्कृती नाही. त्यामुळें अशा चर्चेबाबत बोलणे योग्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

    मुंबई : आरोग्य मंत्री राजेश टोपे हे इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचं निधन झाल्याने सांत्वनासाठी गेले होते अशावेळी राजकीय चर्चा करणे अभिप्रेत नाही. आमची तशी संस्कृती नाही. त्यामुळें अशा चर्चेबाबत बोलणे योग्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले. राजेश टोपे यांच्या भेटीनंतर एमआयएम युतीबाबत आज चर्चांना उधाण आले होते त्यावर जयंत पाटील यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

    उत्तरप्रदेश असो की महाराष्ट्र असो यामध्ये एमआयएमचा प्रयत्न सिद्ध झाला आहे. आता औरंगाबाद महापालिकेत नेमका काय त्यांचा रोल आहे हे स्पष्ट होईल. पालिका निवडणुकीत ते नेमकं भाजपला जिंकवणार आहेत की हरवणार आहेत ते आता कळेल असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

    उत्तरप्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या बहुतांश ठिकाणी पराभवाला एमआयएम कारणीभुत आहे. एमआयएमने सिद्ध करायला हवं की त्यांना भाजपच्या विजयात कोणताही रस नाही. त्यांनी समविचारी पक्षाना अपेक्षित भुमिका घ्यायला हवी. त्यांनी विखारी भाषा वापरू नये असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे.

    अतुल भातखळकर यांच्या विधानाचा कोणताही बोध होत नाही त्यामूळे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांना विचारायला हवे असे माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    राज्यमंत्री शभूराजे देसाई यांनी स्पष्ट केले आहे की सेनेच्या आमदारांना योग्य निधी मिळाला त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत असेही जयंत पाटील म्हणाले.

    मुळा – मुठा नदीबाबत प्रकल्प डिझाईन झाला आहे. त्याचवेळी पर्यावरण प्रेमींनादेखील बोलवण्यात आले होते. त्यामुळे आता कुणाचाही त्याला विरोध असण्याचे काही कारण नाही. मागील पाच सहा दिवसात आमच्या विभागाने अनेक लोकांशी बोलून त्यांच्या शंका समजून घेतल्या आहेत. त्यामुळे विरोध राहिल असे वाटत नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    किरीट सोमय्या केंद्रीय यंत्रणा चालवतात त्यामुळे त्यांना आधीच माहिती असते कुणावर काय कारवाई होणार आहे हे त्यामुळे पुढची माहिती असणार आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

    राजु शेट्टी यांचे मोदींबाबत काही आक्षेप होते म्हणुन ते बाहेर पडले होते त्यामुळे आता परत ते जातील असे वाटतं नाही. मी त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत बोलेन असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी भाजपच्या आमदारांना मोठा निधी दिला. फडणवीस यांनी जितका निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे. तसे फोन करुन भाजप आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही असा स्पष्ट इशारा देताना तिन्ही पक्ष एकत्र आले तर कदापी त्या आमदाराला शक्य नाही. भाजपने आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावे अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.

    भाजपला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्याना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाल्याने भीती दाखवणे सूरु आहेत. आमचे २५ आमदार बाहेर पडणार आहेत मग आम्ही काय वेडे आहोत का? पुन्हा एक माणूस आम्ही परत निवडून येऊ देणार नाही. एवढं सोप्प नाही राजीनामा द्यायचं आणि बाहेर पडायचं. जो महाविकास आघाडीतून बाहेर पडेल त्याला लोकं सळो की पळो करून टाकतील. ते लोकांना काय सांगणार त्यामुळे अशी कुठलीही घटना घडणार नाही. उलट भाजप आमदार आमच्या सरकारवर खुश आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.