‘ते’ पत्र व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आ. संतोष बांगर यांचे स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

  हिंगोली : शिवसेना जिल्हाप्रमुख व कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी हे पत्र जनभावनेच्या दृष्टीने योग्यच असल्याचे म्हंणत आ. बांगर यांची स्तुती केली आहे. त्यामुळे यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यावर आता आ. बांगर यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.

  आ. संतोष बांगर नेमकं काय म्हणाले? 

  रुग्णासाठी सही करून ठेवलेल्या माझ्या पत्राचा कुणीतरी दुरुपयोग केला आहे. तातडीची मदत व्हावी यासाठी एका रुग्णाने पत्र मागितले होते. त्यामुळे सही असलेले कोरे पत्र ऑफिसमधून देण्यात आले. मात्र त्यावर काहीतरी लिहून त्याचा कुणीतरी दुरुपयोग केला, असा खुलासा आमदार बांगर यांनी केला आहे. तसेच एसटी महामंडळाच्या विलीनीकरणा बाबत पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेतील, तो आमचा अधिकार नाही असेही आ. बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

  दरम्यान या पत्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून एसटी कर्मचारी आणि कामगारांमध्ये प्रचंड आक्रोश आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कामगार हे तुटपुंजा वेतनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

  आता वाढत्या महागाई आणि आर्थिक संकटाला कंटाळून एसटी महामंडळाच्या ६३ कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. तरी एसची कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करुन राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

  अतुल भातखळकर काय म्हणाले होते? 

  भाजप नेते आ. अतुल भातखळकर यांनी हे पत्र म्हणजे जनभावना असल्याचे म्हंटले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारवर यावरुन निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर दबाव आणत हे पत्र मी लिहिलेच नाही असं सांगायला लावलं आहे. पण मुख्यमंत्री महोदय किती दिवस किती जणांचा आवाज दाबणार आहात? ६७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाहीत. पक्षातील किंवा पक्षाबाहेरील कुणी बोललं की त्यांचा आवाज दाबण्याची हुकुमशाही चालणार नाही, असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.