‘अजिंक्यतारा’ ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा : शिवेंद्रसिंहराजे

गळीत हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे या हंगामात ऊसाचे विक्रमी ७.५० लक्ष मे.टन ऊस गाळप होणार असून सुमारे ९.०० लक्ष क्विंटल एवढया विक्रमी साखरेचे उत्पादन होणार आहे.

    सातारा : सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. आज पूर्णपणे सक्षम झालेल्या या संस्थेने सातारा तालुकाच नव्हे तर आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान आर्थिकदृष्ट्या उंचावले असून अजिंक्यतारा कारखाना ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

    अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मोठ्या जोमाने सुरु असून चालू हंगामात आतापर्यंत उत्पादीत झालेल्या २,०२,२२२ क्विंटल साखर पोत्यांचे पूजन उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व संचालक, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

    या गळीत हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे या हंगामात ऊसाचे विक्रमी ७.५० लक्ष मे.टन ऊस गाळप होणार असून सुमारे ९.०० लक्ष क्विंटल एवढया विक्रमी साखरेचे उत्पादन होणार आहे. कारखाना व्यवस्थापनाचे काटकसरीचे धोरण आणि नेटके नियोजन याद्वारे हा अनोखा विक्रम कारखाना प्रस्थापित करणार आहे. गाळपास येणाऱ्या ऊसाला एफआरपी सुत्रानुसार, प्रतिटन ३ हजार ६५ रुपये दर दिला जात असून गाळपास येणाऱ्या उसाचे पेमेंट वेळेत अदा केले जात आहे.

    उसपुरवठादार शेतकऱ्यांना उच्चतम दर देण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साकार झाले असून याचे संचालक मंडळास मनस्वी समाधान आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.