थरावरून पडून महिला गोविंदा जखमी, मुंबईतील एमजीएम रुग्णालयात पाठवले, अलिबागमधील वेश्वी गावातील घटना

म्हात्रे यांची मुलगी ही तिसऱ्या थरावर चढली होती. त्यावेळी तिचा तोल जाऊन खाली पडली.

    अलिबाग : अलिबाग तालुक्यातील वेश्वी गावातील संदीप म्हात्रे यांची मुलगी तिसऱ्या थरावरून पडून जखमी झाल्याची घटना गुरुवारी गोपाळ काला सणाच्या दिवशी घडली आहे. मुलीला तातडीने जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

    रायगड जिल्ह्यात गुरुवारी गोपाळकाला सण उत्साहात साजरा होत असताना एक गोविंदा तरुणी थरावरून पडल्याची घटना घडली आहे. वेश्वी गावातील संदीप म्हात्रे यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या घरी दहीहंडी लावली होती. दहीहंडी फोडण्यासाठी कुटुंबातील मुले इतर सदस्य यांनी थर लावले. म्हात्रे यांची मुलगी ही तिसऱ्या थरावर चढली होती. त्यावेळी तिचा तोल जाऊन खाली पडली. बाजूला उभा असलेल्या व्यक्तीने तिला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र ती हातावर पडून खाली जमिनीवर पडली.

    थरावरून जमिनीवर पडल्याने तिला मार लागून जखमी झाली आहे. तातडीने कुटुंबाने अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र मुलगी घाबरलेली असून आणि डोक्याला, अंगाला मार लागल्याने मुंबईला हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार कुटुंबाने रुग्णवाहिकेने एमजीएम रुग्णालयात नेले.