ST कर्मचाऱ्याच्या मृत्यूला एसटी प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप ; सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण

  नागपूर (Nagpur) : नागपूरच्या इमामवाडा आगारातील एका एसटी चालकाचा मृत्यू झाल्यानंतर संपावरील कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कारावेळी निदर्शने केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रामसिंग सूर्यवंशी, असे या चालकाचे नाव आहे.

  सूर्यवंशी यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास एसटी प्रशासनातर्फे तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये कुटुंबीयांना देण्यात येतात. त्यामुळे ते देण्यासाठी वर्धमाननगर आगार व्यवस्थापक गौरीशंकर भगत हे सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी गेले. सूर्यवंशी यांच्या मृत्यूला एसटी प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप उपस्थित कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. विभाग नियंत्रक आल्याशिवाय आम्ही पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेऊ देणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यामुळे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे हेदेखील तातडीने तेथे पोहचले. त्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांची समजूत घातल्यावर तणाव काही प्रमाणात निवळला. त्यानंतर सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.

  आंदोलकांच्या माहितीनुसार, सूर्यवंशी यांचा संपाशी काहीच संबंध नव्हता. कारण संप सुरू होण्याच्या आधापीसून ते वैद्यकीय रजेवर होते. त्यामुळे त्यांचा संपात प्रत्यक्ष सहभागही नव्हता. मात्र प्रशासनाने कोणतीही शहानिशा न करता त्यांची रामटेकला बदली केली. आधीच आजारी असलेल्या सूर्यवंशी यांचा या बदलीमुळे तणाव वाढला. या धसक्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप संपकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या मृत्यूला एसटी प्रशासन जबाबदार असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

  शुक्रवारी ४५ हजारांचे उत्पन्न
  शुक्रवारी गणेशपेठ आगारातून सात बसेसनी २६ फेऱ्या केल्या. त्याद्वारे एसटीला ४५,०७५ रुपयांचे उत्पन्न झाले. भंडारा, सावनेर, उमरेड, काटोल, रामटेक या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या.

  निलंबित ४३५ वर
  एसटीच्या नागपूर विभागात आतापर्यंत ४३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, तर रोजंदारीवरील ९० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ३२ कर्मचाऱ्यांच्या विभागात इतरत्र बदल्या करण्यात आल्या आहेत.