महिलेच्या चारित्र्य, प्रतिष्ठेवरील आरोप नैतिकरित्या अयोग्य; दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय

एखाद्या महिलेच्या किंवा स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर, प्रतिष्ठेवर आणि स्वाभिमानावर आरोप कऱणे तसेच अश्लिल आणि आक्षेपार्ह शब्द वापरणे, हे नैतिक आणि सामाजिकरित्या अयोग्य आहे. अशी व्यक्ती दया अथवा माफीसाठी पात्र ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी पतीला दुसऱ्या पत्नीशी गैरव्यवहार केल्याप्रकरणी १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच १० हजारांचा दंडही ठोठावला.

    मुंबई : एखाद्या महिलेच्या किंवा स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर, प्रतिष्ठेवर आणि स्वाभिमानावर आरोप कऱणे तसेच अश्लिल आणि आक्षेपार्ह शब्द वापरणे, हे नैतिक आणि सामाजिकरित्या अयोग्य आहे. अशी व्यक्ती दया अथवा माफीसाठी पात्र ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी पतीला दुसऱ्या पत्नीशी गैरव्यवहार केल्याप्रकरणी १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच १० हजारांचा दंडही ठोठावला.

    याचिकाकर्ती महिला आरोपीची दुसरी पत्नी असून दोघांनी पहिल्या पत्नीच्या संमतीने लग्न केले होते. आणि आरोपी दोन्ही पत्नींसोबत राहत होता. मात्र, काही दिवसांनी पतीने आपल्या चारित्र्यावर अपमानास्पद आणि अश्लील मेसेज पाठवल्याची तक्रार घेऊन पिडीता याचिकाकर्तीने डीएन नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याने तिच्यावर शाब्दिक शिवीगाळ केली आणि तिच्या आईच्या चारित्र्यावरही टीका केली. त्यानंतर त्या नराधमाने तिचा मोबाईल हिसकावून तिच्या कपाळावर फेकला त्यामुळे तिच्या कपाळाला इजा झाली. याबाबत पिडीतेने आईला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर आईनेही पीडितेच्या बाजूने साक्ष दिली. तेव्हा, एकाही प्रत्यक्षदर्शीचा जबाब याप्रकरणात नोंदवण्यात आला नसल्याचा दावा करत आरोपीला माफ कऱण्यात यावे, अशी मागणी त्याच्याकडून कऱण्यात आली.

    दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी एस.ए.आर. सय्यद यांनी असे निरीक्षण नोंदवले की, सदर प्रकऱणात आरोपी आणि पिडीता पती-पत्नी आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या घटनेमुळे पत्नीवर मानसिक आणि भावनिक आघात झाला आहे. तसेच समोरील परिस्थितीजन्य पुरावे पाहता ते घडनेशी सुसंगत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपीला १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच पिडीतेला झालेला त्रास आणि आघाताबद्दल १० हजारांचा दंडही ठोठावला.