माजी विद्यार्थ्यांची २५ वर्षांनी पुन्हा भरली शाळा; १९९६ मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा

पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.

  बारामती : पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे.

  सुपे (ता.बारामती) येथील श्री शहाजी हायस्कूलमध्ये १९९६ साली शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच दौंड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण बेट या ठिकाणी पार पडले. या स्नेहसंमेलनात 174 पैकी 98 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

  कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व्ही. एस. शितोळे, डी. बी. सपकाळ, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे, ज्येष्ठ पत्रकार जयराम सुपेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना व्ही. एस. शितोळे म्हणाले, २५ वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून निश्चित आनंद वाटला. सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत, याचा फायदा समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी ठराविक निधी शाळेकडे जमा करून त्या व्याजातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यावेळी वर्गशिक्षक नंदकुमार काकडे, अशोक लोणकर, अशोक बसाळे, डी.जे लडकत यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

  यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

  शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्र मैत्रिणींचा फेटा बांधून स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिएटिव्ह फ्रेंड्स 97 ग्रुपचे अध्यक्ष गणेश खैरे, उपाध्यक्ष गणेश जाधव, कार्याध्यक्ष नाना तरटे, प्राजक्ता बसाळे, सुभाष काळखैरे, अमर काळखैरे, हनुमंत कुतवळ, प्रवीण भोंडवे, नवनाथ खेत्रे, निलेश बोराटे, सचिन खैरे, नितीन कुतवळ, प्रकाश देशपांडे, अखिल आत्तार, सीमा ढमे, शैला भोंडवे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राजक्ता बसाळे यांनी केले सूत्रसंचालन नितीन नगरे यांनी केले तर आभार गणेश जाधव यांनी मानले.