
दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक (Auto Driver) शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला.
सातारा : दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक (Auto Driver) शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा शहरलागत असणाऱ्या शाहूनगर येथील माधुरी आनंद जोशी यांनी पोवईनाक्यावर असणाऱ्या एका बँकेतून दीड लाख रुपये काढले होते. पैसे काढल्यानंतर त्या रिक्षाने घरी निघाल्या होत्या. त्यांनी रिक्षा सोडली आणि किरकोळ खरेदीसाठी त्या खाली उतरल्या. यानंतर रिक्षाचालक तेथून निघून गेला. दरम्यान, आपल्याकडील पैसे कुठेतरी गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या घाबरुन गेल्या आणि त्यांनी तत्काळ सातारा शहर पोलीस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला होता.
दरम्यान, रिक्षाचालक शंकर पवार यांनी बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे माधुरी जोशी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी तत्काळ पैशांची बॅग माधुरी यांना परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक समीर कदम, हवालदार सुजीत भोसले, पकंज ढाणे, अभय साबळे, सोमनाथ शिंदे, सागर गायकवाड यांनी सत्कार केला.