अमरावती जिल्हा गारठला ; पारा ५ अंशांपर्यंत घसरला

अमरावतीच्या तुलनेत उंचावर असलेल्या चिखलदरा व परिसरात नेहमीच थंडी अधिक राहते. दरम्यान, सोमवारी सकाळी चिखलदरा व परिसरात पाऱ्याने तर यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा निचांक गाठला आहे. यंदाच्या वर्षांत आतापर्यंत पारा ५ ते ६ अंशांपर्यंत खाली घसरला नव्हता.

    अमरावती (Amravati) : विदर्भाचे नंदनवन असलेल्या पर्यटननगरी चिखलदरा व परिसरात सोमवारी पहाटे पारा ५ ते ६ अंशांपर्यंत खाली घसरल्यामुळे कडाक्याची थंडी मेळघाटवासीयांनी अनुभवली. या कडाक्याच्या थंडीतही पर्यटकांचा उत्साह मात्र कायम दिसून आला आहे. सध्या थंडीची लाट आली असून अमरावती शहर व ग्रामीण भागातही थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे.

    अमरावतीच्या तुलनेत उंचावर असलेल्या चिखलदरा व परिसरात नेहमीच थंडी अधिक राहते. दरम्यान, सोमवारी सकाळी चिखलदरा व परिसरात पाऱ्याने तर यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा निचांक गाठला आहे. यंदाच्या वर्षांत आतापर्यंत पारा ५ ते ६ अंशांपर्यंत खाली घसरला नव्हता.

    कडाक्याच्या थंडीमुळे चिखलदऱ्यात दिवसभर प्रत्येकाच्या अंगात ऊब देणारे कपडे व काही ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आले. बोचरी थंडी असल्यामुळे थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यात पोहोचले आहेत. थंडीत पर्यटकांचा उत्साह दिसून आला. जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत पार १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सध्या १० अंशाच्यावर तापमान आहे.