
शेतकऱ्यांच्या मागणीवरून शिरोळमधील शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले. काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे.
शिरोळ : शेतकऱ्यांच्या मागणीवरून शिरोळमधील शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले. काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे.
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने आंदोलन अंकुश यांच्या वतीने केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात या करिता शिरोळच्या शिवाजी चौकात ऊसाने भरून जाणाऱ्या बैलगाड्या रोखत असताना शिरोळ पोलिसांनी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर दत्त कारखाना समर्थक शेतकऱ्यांनी आमचे नुकसान होऊ नये, यासाठी ऊसाने भरलेल्या बैलगाड्या ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना कराव्यात, अशी भूमिका घेतल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
उसाच्या फडातून बैलगाडी अथवा ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना पर्यायी वाहन उपलब्ध करून द्यावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. महापूर आणि रासायनिक खतात झालेली दरवाढ मजुरीचे वाढलेले पगार यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कारखान्याने उसाच्या फडातून वाहने बाहेर काढण्याकरिता मोफत व्यवस्था करावी, अशी मागणी आंदोलन अंकुशच्या वतीने दत्त साखर कारखानाकडे करण्यात आली होती. यावेळी दत्त कारखान्याने या मागणीकडे दुर्लक्ष केले. यामुळे गुरुवारी दुपारी शिरोळच्या शिवाजी चौकात आंदोलन अंकुशच्या वतीने उसाने भरलेले वाहने व बैलगाडी रोखण्याचा निर्णय घेऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी ही वाहने बैलगाडी रोखत असताना शिरोळ पोलिसांनी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे, कृष्णा गावडे, भूषण गंगावणे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर उसाने भरलेल्या बैलगाड्या व वाहन कारखान्याकडे रवाना झाली. यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखानाचे समर्थक वाहतूक संघटनेचे धनाजी पाटील नरंदेकर, माजी सरपंच दरगू गावडे, नगरसेवक पंडित काळे, विठ्ठल पाटील, योगेश पुजारी, चिक्कू गुरव आदी शेतकऱ्यांनी आपली वाहन कोणी अडवू नयेत आमचं नुकसान होतं. त्यामुळे आमची उसाने भरलेल्या बैलगाड्या व वाहने कारखानाकडे गाळपासाठी जावीत अशी भूमिका घेतली.
यामुळे आंदोलक आणि शेतकऱ्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात नंतर सर्व उसाने भरलेले वाहने बैलगाड्या पोलीस बंदोबस्तात कारखान्याकडे रवाना करण्यात आली. शिरोळमध्ये सध्या पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे
” पोलिस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर आंदोलन थांबणार नाही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमच्या मागण्या रास्त आहेत यापुढे आंदोलन आणखी तीव्र करू “
– धनाजी चुडमुंगे, प्रमुख आंदोलन अंकुश शिरोळ