लक्ष्य स्पोर्ट्स आणि अमल्गम स्टीलचा पुढाकार, महिला टेनिसपटूंसाठी ‘प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम’ प्रकल्प

    पुणे : देशाच्या महीला टेनिसपटूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकदार कामगिरी करावी यासाठी ‘प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी ‘ लक्ष्य स्पोर्ट्स’ या संस्थेने  कोलकाता येथील अमल्गम स्टील या उद्योगाशी सहकार्य करार केला आहे.

    देशातील उदयोन्मुख टेनिस खेळाडूंपैकी मुलींच्या गटातून गुणवान खेळाडू शोधून त्यांच्यातून भविष्यात ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अधिकाधिक खेळाडू चमकण्यासाठी दर्जेदार खेळाडू घडविण्याचे आव्हान दोन्ही संस्थांनी स्वीकारले आहे. याविषयी लक्ष्यचे उपाध्यक्ष सुंदर अय्यर आणि अमल्गम स्टीलचे समनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक विजय पांडे यांनी या प्रकल्पाविषयी पत्रकार परीषदेत माहीती दिली.

    संकल्पनेतून आकाराला आलेल्या या प्रकल्पाद्वारे कुमार मुलींच्या गटातील गुणवान टेनिसपटू शाेधण्यात येतील. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात १४ व १६ वर्षे वयोगटातील माया राजेश्वरन, प्रिशा शिंदे, काश्वी सुनील, ऐश्वर्या जाधव, रिशिता रेड्डी, नैनिका रेड्डी, याशिका शौकीन, सेजल भुतडा व आकृती सोनकुसरे या मुलींची निवड करण्यात आली आहे.

    या प्रकल्पातंर्गत  प्रशिक्षण आणि विविध स्पर्धामधील सहभागासाठी अर्थसाहाय्य,  विविध प्रमुख आयटीएफ स्पर्धासाठी प्रवास व निवासाकरिता खर्चाची जबाबदारी,  सर्वोच्च दर्जा गाठण्यासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेण्याकरिता आवश्यक खर्च,  स्पर्धादरम्यान प्रशिक्षकाची उपस्थिती व मार्गदर्शनाचा लाभ,  सर्वोत्तम कामगिरीसाठी उच्च दर्जाची अत्याधुनिक साधने व अन्य सुविधा, तंदुरुस्तीसाठी व दुखापतीतून सावरण्यासाठी क्रीडाविज्ञानाच्या साहाय्याने उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेले प्रशिक्षण या मुलींना मिळणार अाहे.