शतपावली करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला अज्ञात वाहनाने उडवले; जागीच झाला मृत्यू

शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस समोरील रस्त्याने शतपावली करण्यासाठी गेलेल्या डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर यांना भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने उडवले. यामध्ये ते जागीच ठार झाल्याची घटना घडली.

    जळगाव : शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस समोरील रस्त्याने शतपावली करण्यासाठी गेलेल्या डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर यांना भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने उडवले. यामध्ये ते जागीच ठार झाल्याची घटना घडली.

    याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षद भाऊराव लांडे (वय 43, रा. गोरवले रोड, पोर्तुगीज चर्चजवळ, मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हर्षद लांडे हे वडील, पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत मुंबई येथील पोर्तुगीज चर्चजवळ वास्तव्याला आहे. ते डब्ल्यूएचओच्या नाशिक विभागाचे टीबी ऑफीसर म्हणून नोकरीला होते. डब्ल्यूएचओच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी ते आपल्या टीमसह जळगाव शहरातील हॉटेल मिनर्वा येथे उतरले होते.

    दिवसभर त्यांनी मीटिंगला हजेरी लावली. मीटिंग आटोपल्यानंतर त्यांनी जेवण केले. त्यानंतर रात्री 11 च्या सुमारास ते आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौकदरम्यान शतपावली करण्यासाठी निघाले. यावेळी हॉटेल रॉयल समोरून जात असताना रात्री साडेअकरा वाजता भरधाव जाणाऱ्या चाकचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

    दरम्यान, या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी मदतीची धाव घेऊन खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.