आनंद भारती समाजातर्फे ‘महाराष्ट्राची संस्कृती’ रंगावली प्रदर्शन

या प्रदर्शनात गणेशोत्सव, गुढीपाडवा, वारकरी संप्रदाय, कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा उत्सव, जेजुरीचा खंडेराय, वाघ्या मुरळी, नागपंचमी आदी विषयांवर रंगावली रेखाटल्या आहेत.

    ठाणे : सुमारे एक शतकाहून जास्त काळाची परंपरा असलेल्या आनंद भारती समाज आणि कलाछंद रांगोळीकार यांच्या संयुक्त विद्यमाने १२० व्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती या विषयावर रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या प्रदर्शनात गणेशोत्सव, गुढीपाडवा, वारकरी संप्रदाय, कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा उत्सव, जेजुरीचा खंडेराय, वाघ्या मुरळी, नागपंचमी आदी विषयांवर रंगावली रेखाटल्या आहेत. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचा अनुग्रह लाभलेले चेंदणी कोळीवाड्यातील आनंद भारती महाराज यांच्या ब्रम्हीभूत होण्याचा दिवस हा चंपाषष्ठी उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो.

    आनंद भारती समाजाचे अध्यक्ष सुभाष मोरेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. संस्थेच्या सभागृहात सुरु असलेले हे रंगावली प्रदर्शन नागरिकांना संध्याकाळी ६ ते १० दरम्यान विनामूल्य बघता येणार आहे.