राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून विकास आघाडी-शिवसेनेत फूट पाडण्याचे काम : आनंदराव पवार

    इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगरपालिकेत पुन्हा एकदा विकास आघाडी व मित्रपक्ष शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचा बडा नेता विकास आघाडी व शिवसेनेत फूट पाडण्याचे काम करित असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व शिवसेना गटनेते आनंदराव पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. जिल्हा व तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विशिष्ट एका पक्षाचे काम न करता शासनाचे काम करावे असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.

    पवार म्हणाले , राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ११ कोटींच्या विकासाला विरोध करत सलग तीन बैठकांना अनुपस्थिती दाखवली . त्यामुळे विकासकामाला विरोध करण्याचा पायंडा त्यांनी पाडल्याचे दिसून येते . २७ डिसेंबरच्या सभेत शहरातील विकासकामांच्या ३० विषयांची सभा आयोजित केली होती . या सभेकडे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली . त्यानंतर ३ जानेवारी रोजी होणारी सभा बेकायदेशीर असल्याची तक्रार राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे . २७ डिसेंबर रोजी दुपारीच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सभागृहातील सर्व नगरसेवकांना ३ जानेवारीच्या सभेची नोटीस घरी जावून दिली आहे . विकास आघाडी व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी नोटीस मिळाली आहे .

    राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक घरी उपस्थित नसल्याचे कारण सांगून त्यांच्या कुटुंबियांनी सभेची नोटीस स्विकारली नाही . त्यानंतर कायद्याच्या आधारे दुपारी ३ वाजून १८ मिनिटांनी स्पीड पोस्टाने नोटीस पाठवल्या आहेत . तर सर्व नगरसेवकांना मोबाईलवरही नोटीस पाठवल्या आहेत . त्यामुळे ३ जानेवारीच्या सभेला ७ दिवस पूर्ण होत असल्याने सभा घेण्यास काहीच हरकत नाही असे स्पष्टीकरण आनंदराव पवार यांनी दिले आहे .

    शासनाच्या अध्यादेशानुसार ईश्वरपूर नामकरण विषय ..!

    महाविकास आघाडीच्या सरकारने ६ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार रस्ते व गावांना जातीवाचक , धर्मवाचक नावे बदलून नवी नावे देण्याचा अध्यादेश केला आहे. हिंदू व इस्लाम हा धर्म असून मुस्लिम जात आहे.शासनाच्या अध्यादेशानुसार इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा विषय नगरपालिका सभेच्या विषय पत्रिकेल लावला आहे . ईश्वरपूर नामकरणासाठी शहरातील ४० हजार नागरिकांनी सह्याद्वारे पाठिंबा दर्शविला आहे जनतेच्या भावनांचा आदर करत कोणतेही राजकारण न करता ही मागणी केली आहे.