अनिल देशमुखांच्या स्वीय सचिवाने माझ्याकडे पैसे मागितले नव्हते; सचिन वाझेचे आयोगासमोर घुमजाव

सूत्रांनी सांगितले की, तत्पूर्वी या अनुषंगाने परमबीर यांच्या पत्रातील परिच्छेद सातचा संदर्भही वाझेला दाखवण्यात आला. त्यावेळी त्याने 'आयोगासमोर यापूर्वी माझे प्रतिज्ञापत्र दाखल करताना परमबीर यांच्या पत्रातील तपशील मी वाचला होता', हे वाझेचे म्हणणेही न्या. चांदिवाल यांनी नोंदवून घेतले. 'देशमुख यांनी वाझेला अनेकदा ज्ञानेश्वरी बंगल्यावर बोलावले आणि पैसे ....

  मुंबई (MUMBAI) :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटी वसुली आरोप प्रकरणी गठीत न्या के. यू. चांदीवाल चौकशी आयोगासमोर काल माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यानी ऐकीव माहितीवर आरोप केल्याचे म्हणत पुरावे नसल्याचे सांगितले होते. आता देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी माझ्याकडे स्वत:साठी पैशांची किंवा कमिशनची मागणी केली नाही किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पैसे देण्याविषयी संदेश दिला नाही’, अशी साक्ष देत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे  याने देखील घुमजाव केला आहे.
   
  कोणत्याही कारणासाठी पैसे देण्याचा संदेश दिला नाही
  निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल चौकशी आयोगासमोर वाझे याने बुधवारी साक्ष दिली. पलांडे यांच्यातर्फे अॅड. शेखर जगताप यांनी वाझेची उलटतपासणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार त्याने साक्षीत सांगितले की, संजीव पलांडे यांच्याशी माझा वैयक्तिक परिचय किंवा मैत्री नव्हती. गृहमंत्र्यांचे स्वीय सचिव म्हणून त्यांना ओळखत होतो. माझ्याकडे ज्या गुन्ह्यांचा तपास होता किंवा गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर कक्षाचा (सीआययू) प्रमुख म्हणून ज्या गुन्ह्यांच्या तपासावर मी देखरेख करत होतो त्याबद्दल त्यांच्याशी अधिकृतरीत्या संवाद व्हायचा. फेब्रुवारीत मी पलांडे यांना ज्ञानेश्वरी बंगल्यात भेटलो. त्यांनी माझ्याकडे स्वत:साठी पैशांची किंवा कमिशनची मागणी केली नाही किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पैसे देण्याविषयी संदेश दिला नाही’, अशी माहिती वाझेने प्रश्नांच्या उत्तरात दिली.

  परमबीर यांच्या पत्रातील तपशील वाचला
  सूत्रांनी सांगितले की, तत्पूर्वी या अनुषंगाने परमबीर यांच्या पत्रातील परिच्छेद सातचा संदर्भही वाझेला दाखवण्यात आला. त्यावेळी त्याने ‘आयोगासमोर यापूर्वी माझे प्रतिज्ञापत्र दाखल करताना परमबीर यांच्या पत्रातील तपशील मी वाचला होता’, हे वाझेचे म्हणणेही न्या. चांदिवाल यांनी नोंदवून घेतले. ‘देशमुख यांनी वाझेला अनेकदा ज्ञानेश्वरी बंगल्यावर बोलावले आणि पैसे जमा करण्यास सांगितले. फेब्रुवारीच्या मध्यावर व त्यानंतर देशमुख यांनी वाझेला बंगल्यावर बोलावले होते. त्यावेळी त्यांचे स्वीय सचिव पलांडे यांच्यासह अन्य एक दोन कर्मचारी उपस्थित होते’, असे परमबीर यांच्या पत्रातील परिच्छेद सातमध्ये नमूद आहे.

  हॉटेल व्यावसाईकांना पैसे मागितले नाही
  ‘हॉटेल मालक महेश शेट्टी किंवा जया पुजारी किंवा मुंबईतील अन्य बार अँड रेस्टॉरंट मालकांना तुम्ही सीआययूच्या कार्यालयात बोलावले होते का? निर्धारित वेळेनंतरही हॉटेल सुरू राहू द्यायचे असल्यास पैसे द्यावे लागतील, असे म्हणत तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती का?’, या प्रश्नांवर वाझेने नकारार्थी उत्तर दिले.