परमबीर यांच्या खंडणी आरोपांचे सत्य बाहेर आणणार; देशमुखांची चांदिवाल आयोगासमोर स्पष्टोक्ती

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले. उच्च न्यायालयानेही या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

  मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांबाबतचे सत्य आपण सर्वांसमोर आणणार असल्याचे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सोमवारी या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) स्पष्ट केले.

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले. उच्च न्यायालयानेही या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत चौकशी सुरू आहे.

  सोमवारी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्यावतीने ॲड. नायडू याने अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारले. वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याच्या तक्रारी सीआयडीमधील अधिकाऱ्यांकडून मिळाल्या होत्या. त्यावेळी आपण नाईक यांच्या मुलीला भेटलो होतो, तिने वडिलांच्या आत्महत्येची योग्य चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे नाव घेतले असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

  सचिन वाझेला ओळखत नाही

  वरिष्ठ आयपीएस अधिकारी मिलिंद भारंबे यांची शहरातील गुन्हे सह आयुक्तपदी नेमणूक वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात आल्यानंतर झाली की त्यापूर्वी झाली हे आपल्याला आठवत नाही, असे देशमुख यांनी सांगितले. वाझे यांच्या वकिलाने पुढे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिट (सीआययू) च्या प्रमुखाने अतिरिक्त पोलीस आयुक्तांना अहवाल द्यावा का ?, नियमानुसार त्यांनी विभागाचे कामकाजाचा अहवाल (सीआययू प्रमुख) यांना देणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

  वाझेबाबत भारंबे यांनी तुमच्याकडे तक्रार केली होती का त्यावर ३० मार्च २०२१ पर्यत तक्रार आली नसल्याचे देशमुखांनी सांगितले. वाझे यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या तपास करण्याची सूचना केली होती का, त्यावर वाझे कोण आहे ? हे आपल्याला माहीत नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

  हेमंत नगराळे यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती ही वाझेविरोधात कारवाई कऱण्यासाठी करण्यात आली होती का ? यावर नगराळे यांची बदली राज्य सरकारकडून करण्यात आली होती त्याचा मी एक भाग होतो असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

  भारंबेना साक्षीदार बनविण्याची मागणी फेटाळली

  गुन्हे विभागाच्या सह आयुक्तपदी असलेल्या मिलिंद भारंबेना या प्रकरणी साक्षीदार म्हणून आयोगाने बोलवावे अशी मागणी वाझेकडून करण्यात आली. मात्र, आयोगाने वाझेची मागणी अमान्य करत फेटाळून लावली.