समाजाच्या उन्नतीसाठी गांधीविचारांची गरज; अण्णा हजारे यांचे प्रतिपादन

    पुणे : “जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत. या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ध्येयवाद, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करावेत. आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. त्यावर मात करून यशस्वी होता आले पाहिजे. गांधीविचार हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी गांधीविचारांचा अंगिकार करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे (Anna Hajare) यांनी केले.

    सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशनच्या वतीने राळेगणसिद्धी येथे झालेल्या कार्यक्रमात अण्णा हजारे यांना तिसरा ‘गांधीयन फिलॉसॉफी अवार्ड’ प्रदान करण्यात आला. यावेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत धिवरे, वी सिटीझन्सचे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, शिक्षण संचालक दिनकर टेमकर, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी किर्ती जमदाडे, ‘सूर्यदत्ता’चे कार्यकारी संचालक प्रा.अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, रोहित संचेती आदी उपस्थित होते.

    राळेगणसिद्धी येथे निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या पर्यावरण संमेलनावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अण्णा हजारे यांना भारताचे दुसरे गांधी असेही संबोधले जाते. त्यांनी गांधीमार्गाने उभारलेल्या चळवळी जगभर गाजल्या. राळेगणसिद्धी येथे त्यांनी केलेले ग्रामविकासाचे कार्य, भ्रष्टाचाराविरोधातील कार्य, अनेक संकटाना शांत व संयमी पद्धतीने सामोरे जात त्यातून मार्ग काढत अण्णांनी समाजसेवेचा वसा कायम जपला आहे. याची दखल घेऊन ‘सूर्यदत्ता’च्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

    अण्णा हजारे म्हणाले, “समाजातील काही व्यक्ती व्यक्तिगत संसार मोठा करण्यासाठी धडपडत असतात. मात्र, संजय चोरडिया यांनी सूर्यदत्ता ग्रुप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून समाजातील ज्ञानाचा संसार अधिक मोठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजाला उपयोगी असे काम करायला हवे. सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येतील, आरोप-प्रत्यारोप होतील, पण त्यावर शब्दातून, टीकेतून उत्तर न देता आपल्या कार्यातून द्यावे. बदल्याची भावना आपल्या मनात असू नये. अहिंसा, शांतता, प्रामाणिकता या गोष्टींचा अवलंब करावा.”