नागपुरात ओमायक्रॉनचा दुसरा बाधित रुग्ण आढळला; प्रशासनाची चिंता वाढली

दुबईतून आलेल्या या २१ वर्षीय युवकावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करून त्यांना सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

    नागपूर (Nagpur) : राज्यात करोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना आता ओमिक्रॉनच्या जीवघेण्या संसर्गामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपूर शहरात ओमायक्रॉनच्या दुसऱ्या बाधिताची नोंद करण्यात आली. दुबईतून आलेल्या या २१ वर्षीय युवकावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

    काही दिवसांपूर्वी हा रुग्ण दुबईहून प्रवास करून नागपुरात दाखल झाला होता. या रुग्णाची करोना चाचणी तीन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यापू्र्वीच या रुग्णाला एम्समध्ये विलगीकरणात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी ओमायक्रॉनचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करून त्यांना सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

    जिल्ह्यात सात बाधित
    गुरुवारी जिल्ह्यात सात करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यात चार बाधित शहरात, तर तीन ग्रामीणमध्ये नोंदवण्यात आले. जिल्ह्यात दिवसभरात ३ हजार ७०२ चाचण्या करण्यात आल्या. तर दिवसभरात दहा रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा पन्नासच्या खाली आली आहे. सध्या जिल्ह्यात ४९ सक्रिय रुग्ण आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्याबाहेरील पाच, शहरातील चार आणि ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.