अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरण : जामीन मिळूनही आरोपी नरेश गौरची सुटका लांबली

अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह माजी पोलीस अधिकारी विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गौर यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सचिन वाझेला सिम कार्ड पुरविण्यात आल्याचा गौरचा आरोप ठेवण्यात आला होता.

    मुंबई (Mumbai) : अँटालिया स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या क्रिकेट बुकी नरेश गौरची जेलमधील सुटका आणखी लांबली आहे. नरेश गौरला जामीन मंजूर करून आपल्याच निर्णयाला स्थगिती देण्याचा कनिष्ट न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने रद्द केला. त्या निर्णयाला एनआयएकडून आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी पहिला जामीन मिळालेला नरेश गौर २२ दिवसांपासून अद्यापही कारागृहातच आहे.

    अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह माजी पोलीस अधिकारी विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गौर यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सचिन वाझेला सिम कार्ड पुरविण्यात आल्याचा गौरचा आरोप ठेवण्यात आला होता. नोव्हेंबर महिन्यात एनआयएच्या विशेष न्यायालयाने गौरला जामीन मंजूर केला. मात्र, एनआयएने या निर्णयाला आव्हान देण्यासाठी स्थगिती देण्याची विनंती केली. ती मान्य करत न्यायालयाने आपल्याचा आदेशाला २५ दिवसांची स्थगिती दिली. त्याविरोधात गौरने उच्च न्यायालयात धाव घेतली.

    याचिकेची दखल घेत न्या. संदीप शिंदे यांनी गौरच्या जामीनावर शिक्कामोर्तब केले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने रद्द केलेल्या निर्णयाला एनआयएकडून न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आव्हान देण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान, नरेश गौरच्यावतीने एनआयच्या अर्जाला विरोध करण्यात आला आणि जामीनाची प्रक्रिया पूर्ण करू देण्याची विनंतीही करण्यात आली. निकाल आपल्या विरोधात गेल्यास पुन्हा शरण येण्यास आपण तयार असल्याचेही त्याच्यावतीने खंडपीठाला सांगण्यात आले. मात्र, खंडपीठाने याप्रकरणावर सविस्तर सुनावणी घेण्याचे निश्चित करत शुक्रवारी रोख रक्कम भरून होणारी जामीनाची प्रक्रिया तूर्तास थांबवण्यास सांगितली. त्याला याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी तयारी दर्शवली. त्यामुळे या याचिकेवर येत्या बुधवारी सविस्तर सुनावणी पार पडणार आहे.