माफी मागा अन्यथा आमच्या स्टाईलने वठणीवर आणू; गुलाबरावांच्या वक्तव्यावर नवनीत राणा संतापल्या

गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री आणि माजी खासदार हेमा मालिनी तसंच देशातील समस्त महिला वर्गाचा अपमान केलाय. ज्या शिवसेना पक्षातून ते येतात, त्या पक्षाचा-बाळासाहेबांच्या सुसंस्कृतपणाचा त्यांना विसर पडलाय. गुलाबराव पाटील यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी किंवा दिलगिरी व्यक्त करुन विधान मागे घ्यावं, अन्यथा ......

  अमरावती (Amravati) : शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Hema Malini) गालाशी केली. गुलाबरावांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपने गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरं जा, असा इशारा दिलाय. अशातच, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी व्हिडीओ शेअर करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

  “गुलाबराव पाटील यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या सुसंस्कृतपणाचा विसर पडला असून त्यांनी हे विधान मागे घेऊन तात्काळ माफी मागावी अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना वठणीवर आणू”, असं म्हणत नवनीत राणा यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे.

  नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या निमिताने राज्यातलं वातावरण ऐन थंडीत चांगलंच तापलंय. सेना उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. पण यावेळी त्यांचा तोल जरासा ढळला. आपल्या मतदारसंघात आपण खूप चांगले रस्ते केले आहेत, हे सांगताना त्यांनी रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली.

  “गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री आणि माजी खासदार हेमा मालिनी तसंच देशातील समस्त महिला वर्गाचा अपमान केलाय. ज्या शिवसेना पक्षातून ते येतात, त्या पक्षाचा-बाळासाहेबांच्या सुसंस्कृतपणाचा त्यांना विसर पडलाय. गुलाबराव पाटील यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी किंवा दिलगिरी व्यक्त करुन विधान मागे घ्यावं, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने गुलाबराव पाटलांना वठणीवर आणू”, असा इशारा नवनीत रवी राणा यांनी दिला आहे.

  नवनीत राणा काय म्हणाल्या?
  “गुलाबराव पाटील यांना महिलांबाबत कितपत आदर आहे व शिवसेना कोणत्या वाटेवर जात आहे हे यावरून सिद्ध होत असून स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्तृत्वाचा व ध्येय धोरणाचा हा अपमान असून गुलाबराव पाटील यांनी या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल खासदार श्रीमती हेमामालिनी व समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागावी”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

  गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले होते?
  राज्यात नगरपंचायत निवडणुकीचा धामधूम सुरु आहे. प्रमुख पक्षांचे नेते विविध ठिकाणी सभा घेत आहे. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, गेली 30 वर्षे एकनाथ खडसे या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केले आहेत”

  एकनाथ खडसे यांचं गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर
  गुलाबराव पाटील यांच्या टीकेला खडसेंनीही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “गेली 30 वर्षे मी या भागातून निवडून येत आहे. मी कधीच हरलो नाही. काम केल्यामुळेच लोकांनी मला निवडून दिलं आहे. हे पाटलांनाही माहिती आहे”, असं खडसे म्हणाले.