बुलढाण्यात इलेक्ट्रॉनिक दुकानावर सशस्त्र दरोडा, दुकान मालकावर तलवारीने सपासप वार करुन हत्या

या हल्यात ते जबर जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतरही जाताना दरोडेखोरांनी तलवारीने पुन्हा त्यांच्या तोंडावर सपासप वार केले. त्यामुळे ते आणखी गंभीर झाले. त्यानंतर ते दोन्ही दरोडेखोर दुकानातील रोख रक्कम घेऊन फरार झाले.

    बुलढाणा (Buldhana) : जिल्ह्याच्या चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात काल रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक कमलेश पोपट यांची हत्या झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहराच्या व्यापारी वर्गासह नागरिकामध्ये या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

    आनंद इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे मालक यांनी रात्री ९:४५ वाजता त्यांच्या दुकानाचे मेन शटर बंद केले व बाजुचे छोटे शटर उघडे ठेवले. यावेळी एका दुचाकीवरून तीन दरोडेखोर दुकानासमोर आले त्यामधील दोन दरोडेखोर दुकानात सशस्त्र घुसले. एका दरोडेखोरांजवळ बंदुक होती. ती बंदुक त्या दरोडेखोरांने दुकानाचे मालक कमलेश पोपट यांच्यावर रोखली यावेळी कमलेश पोपट व दरोडेखोरा यांच्यामध्ये झटापट झाली. कमलेश हे घाबरून शटरकडे पळत असताना दरोडेखोरांनी त्यांना पकडले एका दरोडेखोराने पोपट यांचा गळा आवळून त्यांना रोखुन धरले तर दुसऱ्या दरोडेखोरांने त्यांच्यावर सपासप तलवारीने वार केले.

    या हल्यात ते जबर जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतरही जाताना दरोडेखोरांनी तलवारीने पुन्हा त्यांच्या तोंडावर सपासप वार केले. त्यामुळे ते आणखी गंभीर झाले. त्यानंतर ते दोन्ही दरोडेखोर दुकानातील रोख रक्कम घेऊन फरार झाले.

    कमलेश पोपट यांना जखमी अवस्थेत चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहे. रात्री तीन वाजता जालना येथून श्वानपथक आले होते. मागील काही दिवसांत बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. कायदा व सुव्यवस्था याकडे सुद्धा पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज निर्माण झाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसते.