लष्कराच्या परीक्षेचे पेपर फुटले; सीबीआयकडून वरीष्ठ अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा

लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई अलोक कुमार आणि अलोकची पत्नी प्रियंका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये सीबीआयने लष्करी पेपर फुटी प्रकरणात केलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली होती. यानंतर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक एम. आर. कडोले यांनी दिली.

    पुणे : लष्करामधील क दर्जाच्या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या २०१९ च्या परिक्षेचे पेपर देखील फोडण्यात आल्याचे समोर आले असून, याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदर्न कमांडच्या आर्मी ऑर्डनन्स कोअरमधील लेफ्टनंट कर्नलसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने गेल्या महिन्यात केलेल्या कारवाईत मिळालेल्या माहितीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

    लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई अलोक कुमार आणि अलोकची पत्नी प्रियंका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये सीबीआयने लष्करी पेपर फुटी प्रकरणात केलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली होती. यानंतर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक एम. आर. कडोले यांनी दिली.

    लष्करातील क दर्जाच्या पदांसाठी २०१९ मध्ये भरती झाली होती. परिक्षेची उत्तरपत्रिका आरोपींकडे असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सीबीआयने नजर ठेऊन तपास केला. त्यावेळी आरोपी विकास रायझादाने आठ सप्टेंबर रोजी आरोपी सुसंता नाहकच्या पत्नीच्या मोबाईलवर परिक्षेच्या उत्तरपत्रिका पाठवली. त्यानंतर नाहकने ती उत्तरपत्रिका त्या दिवशी प्रियंका हिच्या मोबाईलवर पाठविल्याचे समोर आले.

    त्यासाठी विकासला ५० हजार व ४० हजार दोन रकमा पाठविल्या. तसेच, आरोपींच्या मोबाईलमधील चॅट पाहिल्यानंतर विकास, सुंसता, अलोककुमार आणि त्याची पत्नी प्रियंका यानी २०२०-२१ मध्ये झालेल्या विविध परिक्षेच्या उत्तरपत्रिका फोडण्यात त्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणात सीबीआयने नवीन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे.