वेड लागले नानाला काय द्यावे ? वंचितला ! तुझ्या गळा, माझ्या गळा; आशिष शेलार यांची उपहासात्मक कविता

  मुंबई – लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे देशभरा

  मध्ये निवडणूकांचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये राजकीय वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे फैरी झाडत आहेत. दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे. या कवितेमधून विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे.

  महाविकास आघाडी व महायुती दोन्ही युतीमध्ये जागावाटपचा गुंता अद्याप सुटलेला नाही. भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरुन विरोधकांना घेरले आहे. ऑफिशियल अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी, परभणीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीबाबत महाविकास आघाडीत अद्याप कोणताही निर्णय होऊ शकला नाही. यावरुन कवितेतून आशिष शेलार यांनी टीकास्त्र डागलं आहे. शेलार यांनी प्रसिद्ध कवी भा. रा. तांबे यांच्या ‘तुझ्या गळा, माझ्या गळा…’ या कवितेचं विडंबन करत मविआवर निशाणा साधला आहे. शेलार यांनी ही कविता एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरदेखील शेअर केली आहे.

  आशिष शेलार यांनी शेअर केलेली कविता

  तुझ्या गळा, माझ्या गळा

  गुंफू आघाडीच्या माळा

  सांगलीची जागा कोणाला?

  चल निघ काँग्रेस चहाटळा !

   

  तुज भिवंडी, मज सातारा

  उत्तर मुंबई कोणाला ?

  वेड लागले नानाला

  काय द्यावे? वंचितला!

   

  तुज मशाल, मज तुतारी

  आणखी हात कोणाला?

  कोण सांगेल मीडियाला?

  पोपटलाल एक नेमलेला!

   

  खुसू खुसू, गाली हसू

  वरवर अपुले रुसू रुसू

  ताईंसाठी एक दिसू

  बाकी जागांवर भांडत बसू!!

   

  कशी कशी, आज अशी

  गंमत घमंडीयाची पाहशी

  आता कट्टी फू काँग्रेसशी?

  तर मग गट्टी कोणाशी?

  (श्रेष्ठ कवी भा.रा. तांबे यांची क्षमा मागून…)