
सात लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकासह दोन खासगी व्यक्ती अमरावती एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
यवतमाळ (Yavatmal) : सात लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकासह दोन खासगी व्यक्ती अमरावती एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. अमरावतीच्या पथकाने येथील स्टेट बँक चौकात काल रात्री (९०.३०) वाजताच्या दरम्यान ही कारवाई केली. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक अनिल घुगल (५२), विद्युत वसानी रा. यवतमाळ, विशाल माकडे रा.यवतमाळ अशी लाचखोरांची नावे आहे. घुगल हे लोहारा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
यवतमाळ येथील ३१ वर्षीय तरुणाविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तक्रारदाराचा जामीन होण्यास मदत होईल, असा ‘से’ पाठविण्यासाठी ठाणेदारांनी दहा लाखाच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात सहा डिसेंबरला तक्रार मिळताच एसीबीच्या पथकाने पडताळणी केली.
सात लाखाच्या लाचेची रक्कम ठाणेदारांनी विशाल माकडे याच्या मार्फत स्वीकारली. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई अमरावतीचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत, पोलिस उपअधीक्षक संजय महाजन, पोलिस उपअधीक्षक किशोर म्हसवडे यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक, अमोल कडू, विनोद कुजांम, सुनील जायभाये, शैलेश कडू यांनी केली.
लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक..
या तक्रारीची ६ तारखेला पंचांसमक्ष पडताळणी केली असता आरोपींनी ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार ७ डिसेंबर रोजी एका मोबाईल शॉपमध्ये सापळा रचून कारवाई करताना घुगल यांनी लाचेची रक्कम विशाल माकडेच्या मार्फत स्वीकारली. तसेच विद्युत वसानी यांनी स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्यावरुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.