हुपरीत सोमवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थी खुल्या होणार

    हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे जतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात केले असून सोमवारी (दि.६) महापरिनिर्वाण दिनानिमित्त या अस्थी दर्शनासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

    तसेच सकाळी नऊ वाजता अस्थी दर्शन व अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, नगराध्यक्षा जयश्री गाट, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार भव्य कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती स्मारक सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष मधाळे, विद्याधर कांबळे, मोहन शिंगाडे, बाळासाहेब कांबळे, महावीर शिंगे, दिनकर कांबळे यांनी दिली.

    चंदेरी नगरी हुपरी येथे मुंबई नंतर डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिंची जपणूक करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक अनुयायी आपल्या लाडक्या नेत्यांला निरोप देण्यासाठी चैत्यभूमीत जमले होते.

    हुपरी शहरातून अनेकजण यामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी हुपरीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर शिंगे, मारुती कंगणे, रामचंद्र कांबळे, रतन कांबळे, नामदेव भोगले, गुंडा फुले, कृष्णा कांबळे, सिताराम कांबळे, आलगोंडा कांबळे, शंकर कांबळे या अनुयायांनी कडक बंदोबस्त असतानाही डॉ.बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी तेथून मिळवल्या होत्या. त्या अस्थी हुपरीत आणून मोठ्या श्रद्धेने गेल्या ६४ वर्षापासून आजतागायत श्रद्धापूर्वक जपणूक करण्यांचे काम दलित, बौद्ध समाजाने केले आहे.

    हुपरी माळभागावर डॉ. बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकर्ती पुतळा आहे. त्या परिसरात चैत्यभूमीची प्रतिक्रती उभारण्यात आले आहे. यामध्ये पवित्र अस्थीची जपणूक केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल व महानिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी या अस्थी खुल्या केल्या जातात.

    यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील अनुयायी अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. सदरचा कार्यक्रमानंतर भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचे नियम पालन करुन होणार आहे. यासाठी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्मारक सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.