रिकामा भूखंड हडपण्यासाठी गुंडांकडून हल्ला; नगरसेवक कमलेश चौधरींसह ४० जणांविरुद्ध गुन्हे

सुरक्षाभिंत व लोखंडी दरवाजाची तोडफोड करून बळजबरीने भूखंडावर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी नगरसेवक कमलेश चौधरी (वय ३५, रा. फ्रेण्ड्स कॉलनी) यांच्यासह त्यांच्या ४० साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

  नागपूर (Nagpur) : सुरक्षाभिंत व लोखंडी दरवाजाची तोडफोड करून बळजबरीने भूखंडावर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी नगरसेवक कमलेश चौधरी (वय ३५, रा. फ्रेण्ड्स कॉलनी) यांच्यासह त्यांच्या ४० साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

  राहुल कानफाडे, दत्ता खोडे (वय ३४), बबलू ठाकूर (वय ३५), राजू माटे, सारिका चौहान, शंकर खडगी व अन्य ४० जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रकाश खूपचंद जैन (वय ७३, रा. धंतोली) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने फ्रेण्ड्स कॉलनी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९९०मध्ये जैन यांनी गेंदलाल खडगी व रामभाऊ खडगी यांच्याकडून मौजा हजारीपहाड येथील भूखंड खरेदी केला. या भूखंडावर त्यांनी सुरक्षाभिंत बांधून लोखंडी दरवाजे लावले.

  त्यानंतर २००१मध्ये जैन यांनी महापालिकेकडून या भूखंडावर लेआउट व अपार्टमेंट बांधण्याची परवानगी घेतली. दरम्यान, यावर आक्षेप घेण्यात आला. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिले. त्यानंतरही नगरसेवक चौधरी व परिसरातील शंभर नागरिक बळजबरीने भूखंडावर ताबा घेण्यासाठी जैन यांना त्रास द्यायला लागले. याबाबत जैन यांनी गिट्टीखदान पोलिसांत तक्रारही केली.

  रविवारी नगरसेवक कमलेश चौधरी, राजू, राहुल, दत्ता व त्यांचे ४० ते ५० साथीदार तेथे आले. त्यांनी लोखंडी दरवाजा व सुरक्षाभिंत तोडायला सुरुवात केली. येथील सुरक्षारक्षक अभिजित समर्थ यांनी जैन यांच्या मोबाइलवर संपर्क करून घटनेची माहिती दिली. ‘गिट्टीखदान पोलिसांना याबाबत माहिती द्या’, असे जैन हे अभिजित यांना म्हणाले. त्यानंतर जैन यांनी त्यांचे पुतणे अॅड. उदित चक्रवर्ती, धनंजय चोपडे, अनिल पवार यांना तेथे जाण्यास सांगितले. तिघेही तेथे पोहोचले. काम आटोपून जैनही तेथे आले. तोपर्यंत चौधरी व त्यांच्या साथीदारांनी सुरक्षाभिंत तसेच लोखंडी दरवाजाची तोडफोड केली होती.

  काठीने मारहाणही…
  धनंजय चोपडे तोडफोडीचे मोबाइलद्वारे चित्रीकरण करीत असताना बबलू ठाकूर व राहुल कानफाडे या दोघांनी धनंजय यांना काठीने मारहाण केली. जैन यांनी गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, तोडफोड करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.