साताऱ्याच्या हाफ हिल मॅरेथॉनमध्ये पुळकेवाडीचा बाळू पुळके अव्वल; उत्तराखंडची मनिषा जोशी महिलांमध्ये अजिंक्य

अतिशय उत्साहात पार पडलेल्या या हेल्दी फिट हाफ हिल मॅरेथॉनमध्ये पुळकेवाडी ता. माण येथील बाळू पुळके या स्पर्धकाने पुरुष गटात प्रथम क्रमांक नोंदविला.

    सातारा : थंड हवेचा गारवा आणि मनात ठासून भरलेला उत्साह आणि फिटनेसच्या वेडापायी यवतेश्वरच्या घाटातून धावणारी पावले अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी साताऱ्याची यंदाची हाफ हिल मॅरेथॉन पार पडली. या मॅरेथॉनवर पुरुष गटातून साताऱ्याचा भूमीपूत्र बाळू पुळके (पुळकेवाडी ता. माण) तर महिला गटातून मनीषा जोशी (गढवाल उत्तराखंड) हे अव्वल ठरले.

    यंदाची हाफ हिल मॅरेथॉन 2021 लक्षवेधी ठरली ती संयोजकांच्या नेटक्या संयोजनामुळे संयोजकांनी दोनशेच्या गटांनी स्पर्धकांना धावण्याचे नियोजन केले होते. रविवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावरून फ्लॅग ऑफ दाखवल्यावर मॅरेथॉनला सुरवात झाली.

    संपूर्ण धाव मार्गावर कोठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी झालेल्या स्पर्धकांना या स्पर्धात प्रवेश देण्यात आला होता. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यासह महसूल यंत्रणेचे अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला.

    सकाळचा बोचरा गारवा आणि वातावरणचा कुंदपणा व यवतेश्वर घाटातील रस्त्यावर आलेले ढग अशा आल्हाददायी वातावरणात सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाट स्पर्धकांच्या धावण्यामुळे रंगीबेरंगी दिसत होता. फुलला होता. यंदा तालीम संघाच्या मैदानावरून स्पर्धा सुरू झाली.

    राजपथ, राजवाडा, समर्थमंदिर मार्गे यवतेश्वर मंदिर ते प्रकृती रिसॉर्ट असा धाव मार्ग निश्चित होता. हजारो तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून धावपटू शनिवारी उशिरा रात्री साताऱ्यात दाखल झाले होते. यावेळी स्पर्धकांचा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेमध्ये जवळपास 1500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

    अतिशय उत्साहात पार पडलेल्या या हेल्दी फिट हाफ हिल मॅरेथॉनमध्ये पुळकेवाडी ता. माण येथील बाळू पुळके या स्पर्धकाने पुरुष गटात प्रथम क्रमांक नोंदविला. त्याने 1 तास 46 मिनिटांची सर्वोत्तम वेळ नोंदविली. मांढरदेव येथील क्रीडा प्रशिक्षक राजगुरू कोचळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या पुळके यांचा हिल मॅरेथॉनसाठी गेल्या तीन महिन्यापासून सराव सुरू होता. पुळके याला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करावयाची भावना त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

    महिला गटातून उत्तराखंडच्या मनिषा जोशी या धावपट्टूने 2 तास 10 मिनिटे अशी सर्वोत्तम वेळ नोंदविली. लोणावळा मॅरेथॉन नंतर अगदी जुजबी सरावानंतर मनिषा हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती. मात्र, शेवटच्या चार किलोमीटरच्या माघारीच्या टप्प्यात कमालीचा दमसास दाखविणाऱ्या मनिषाने महिला गटामध्ये अव्वल कामगिरी नोंदविली .