मुंबईत पार्ट्या आणि कार्यक्रमावर बंदी ! राज्य सरकारचे परिपत्रक

    मुंबई (Mumbai) : राज्यात कोरोना तसेच ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढला आहे. यामुळे राज्य सरकारने राज्यात रात्री जमावबंदी लागू केली आहे. मुंबईत नाताळ आणि ३१ डिसेंबरला नव वर्षाचे स्वागत करताना मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. कोरोना तसेच ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर पार्ट्या, कार्यक्रमावर तसेच कार्यक्रमासाठी एकत्र बंदी घालण्यात आली आहे. तसे परिपत्रक पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी काढले आहे.

    राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनचाही शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी असणार आहे. सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ते निर्बंध मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुसार निर्बंध आणखी कडक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

    पार्ट्यांवर बंदी –
    मुंबईत डिसेंबरच्या सुरुवातीला कोरोनाचे १०० ते २०० रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन गेल्या दोन दिवसात कोरोनाचे ६०० हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच काल ओमायक्रॉनचे ११ रुग्ण आढळून आल्याने रुग्णांचा आकडा ४७ वर गेला आहे. अशा परिस्थितीत नागरिक एकत्र आल्यास कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विषाणू रोखण्यासाठी नाताळ आणि थर्टीफर्स्ट निमित्त आयोजित कार्यक्रम, पार्ट्या तसेच एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.