अवैध दारू विक्रीवर कारवाई होती सुरु; पोलिसांच्या भीतीने नदीत मारली उडी पण…

बारामती तालुक्यातील सोनगाव येथेे अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर भीतीपोटी पळ काढत एकाने निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली. यावेळी दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याने तीन पोलीस जखमी झाले.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती तालुक्यातील सोनगाव येथेे अवैध दारू विक्रीवर (Illegal Liquor Sell) पोलिसांनी कारवाई (Police Action) सुरू केल्यानंतर भीतीपोटी पळ काढत एकाने निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली. यावेळी दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याने तीन पोलीस जखमी झाले.

    मंगलेश अशोक भोसले (वय ४५, रा. सोनगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, सोनगाव (ता. बारामती) येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच मंगलेश भोसले याने भीतीपोटी पळ काढला. जवळच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात त्याने उडी मारत पलीकडील तिरावर पोहून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोहोताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला.

    यावेळी संतप्त जमावाने पोलिसांना डांबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सोनगावातील स्थिती अधिकच चिघळली आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवत घटनास्थळी ती पाठवली आहे. सोनगावमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.