नागपूरात बीअरबार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहील; अशा आहेत सुधारित वेळा

मद्यालये रात्री ९ वाजेनंतर बंद करण्याचा आदेश देऊन एक दिवसही होत नाही, तोच पुन्हा बदल करण्यात आला. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील बीअरबार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचा सुधारित आदेश बुधवारी काढला.

  नागपूर (Nagpur) : मद्यालये रात्री ९ वाजेनंतर बंद करण्याचा आदेश देऊन एक दिवसही होत नाही, तोच पुन्हा बदल करण्यात आला. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील बीअरबार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचा सुधारित आदेश बुधवारी काढला.

  ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश राज्य शासनाकडून २४ डिसेंबर रोजी काढण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी २५ डिसेंबर रोजी आदेश काढून मद्यालये रात्री ९ वाजेनंतर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. २८ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. जिल्हा परमिट रूम असोसिएशने या आदेशाला विरोध करीत मद्यालयांच्या वेळा वाढविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. ग्रामीण भागातील बीअरबार रात्री ११.३०पर्यंत सुरू राहतील. करोनापासून बचावाच्या सर्व उपाययोजनांचे पालन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ५० टक्के क्षमतेने बीअरबार सुरू ठेवता येईल. यासह होम डीलिव्हरी पार्सल पद्धतीने सीलबंद बाटलीतून करता येणार आहे.

  सुधारित वेळा अशा…
  -बीअरबार, क्लब : मध्यरात्री १२ वाजेपर्यंत
  -वाइन शॉप व बीअर शॉपी : रात्री १०.३०पर्यंत
  -देशी दारू : रात्री १० वाजेपर्यंत
  -मद्याचे ठोक विक्रेते : रात्री ८ वाजेपर्यंत

  थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांना बंदी
  रेस्टॉरंट किंमा मद्यालये मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार असली तरी ३१ डिसेंबर रोजी पार्टी करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध घातले आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला असून शहरासाठी महापालिकेच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. जमावबंदीचा आदेश लागू असल्याने रात्री ९ वाजेनंतर ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत.