
मेथीची भाजी आपण खातोच पण मेथीचे दाणे खाण्याने देखील आरोग्यविषयक अनेक फायदे होतात.
जेवणात मेथीची भाजी अनेकांना आवडते. पण अनेकांना मेथीच्या दाणे (Fenugreek Seeds) खाण्यास आवडत नाही. मेथीच्या भाजीच्या तुलनेत मेथीचे दाणे चवीला कडू असतात म्हणून अनेकांना ते खाण्यास आवडत नाही. मात्र, मेथीचे दाणे जरी कडू असले तरी त्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मेथीचे दाणे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरण्यात येतात. यामुळे खाण्याचा स्वाद वाढतो. तर मेथीच्या दाण्यामध्ये प्रोटीन, फायबर, विटामिन सी, लोह आणि अन्य पोषक तत्वही आढळतात, जे शरीरासाठी आवश्यक आहे. आरोग्यासाठी मेथीचे दाणे कसे उपयोगी ठरतात ते जाणून घ्या.
मेथीचे दाणे पूर्वीपासून वापरले जात होते. सुगंधी आणि औषधी वनस्पतीचा प्रभाव क्लिनिकल अभ्यासांद्वारे सिद्ध झाला आहे. मेथीचे दाणे मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात. मेथीचे दाणे हे प्रथिने आणि निकोटीनिक ऍसिडचा समृद्ध स्रोत आहे जे केसांच्या वाढीसाठी पोषक आहे. हे केसांच्या मुळांना मजबूत करते. मेथीच्या दाण्याचे सेवन करताना शक्यतो कच्चे खाऊ नयेत. भिजलेल्या किंवा मोड आणून मगच खावेत . थोड्या मेथ्या वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालाव्यात आणि सकाळी उठल्यावर त्या चावून खाव्यात.त्या कडवट लागतात पण विविध समस्यांवर उपयुक्त असतात.
१. मधुमेह
मधुमेहाच्या रुग्णांना, विशेषतः टाईप-२ च्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मेथ्यांचा निश्चित उपयोग होतो. ज्यांची रक्तशर्करा जास्त आहे अशांना ती नियंत्रित राहण्यास मेथ्यांचा उपयोग होतो.
२. हृदयविकारमध्ये उपयुक्त
रात्री भिजवलेले मेथ्यांचे दाणे सकाळी खाल्ल्याने, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होऊ लागते.त्यामुळे उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन ती नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
३. पित्ताचा त्रास
ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास आहे, त्यांना शरीरातील आम्लता कमी होण्यासाठी मेथ्यांचा उपयोग होतो.
४. बद्धकोष्ठता
सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते.
५. वजन कमी करण्यास उपयुक्त
मेथ्या खाल्ल्याने मेटाबॉलिक रेटही वाढतो, चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
६. मासिकपाळी मध्ये उपयुक्त
स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात पोट दुखणे, कंबर दुखणे किंवा पाय दुखणे अश्याप्रकारचे त्रास मेथ्यांच्या नियमित सेवनाने कमी होतात. तसेच प्रसूती नंतर मातांनी मेथ्यांचे सेवन केल्यास त्यांच्या स्तनपानासाठी दुधाचे प्रमाण वाढते.
७. केसांच्या समस्यांवर
मेथ्यांचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते कुटून, त्याची पेस्ट बनवावी. आंघोळीपूर्वी तासभर ती पेस्ट केसांच्या मुळाशी लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि भरपूर पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. यामुळे केस गळण्याचे कमी होते आणि केसातील कोंडा दूर होतो.
८. त्वचेच्या समस्या
मेथ्यांमुळे त्वचेवर येणारी मुरुमे होतात तसेच त्वचेविषयक इतर तक्रारी दूर होऊन होऊन त्वचेचा तजेला वाढतो.