भोंदूबाबाने महिलेकडे केली ‘ही’ मागणी की त्याला खावी लागली तुरुंगाची हवा

भोंदूबाबावर नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी : महिलेवर जादूटोणा करून कमरेच्या खाली पांगळे करण्याची भीती घालून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदूबाबाला वाकड पोलीसांनी जेरबंद केले.

    विलास बापूराव पवार उर्फ महाराज (वय ४१, रा. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. महिलेने २१ डिसेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विलास याने महिलेला फोन केला. महिलेला कमरेच्या खाली पांगळे करण्याबाबत तिच्या पतीने सांगितले असल्याचे तिला सांगितले. महिलेच्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्यांचे आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून विलासने महिलेला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसाच्या शरिरावर विशिष्ट ठिकाणी तीळ आहे. त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करू शकणार नाही, असे विलासने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वतःचा एक अश्लील व्हिडिओ पाठवून त्यात तीळ दाखवले. व्हीडीओ पाठविल्यानंतर पुन्हा पीडित महिलेला कॉल करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच माझ्याशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटूंब सुखी राहील, असे म्हणून वारंवार शरीरसुखाची मागणी करून पीडीत महिलेचा विनयभंग केला. वाकड पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या मदतीने २५ डिसेंबर रोजी विलासला डांगे चौक येथे जेरबंद केले.

    त्याच्यावर नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील, फौजदार गणेश तोरगल यांनी ही कारवाई केली.