शनिशिंगणापुरात भक्तांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा आक्षेप

शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. या विरोधात काही वर्षांपूर्वी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर हा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला. मात्र, काही काळातच सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच चौथऱ्यावर प्रवेश बंद करण्यात आला होता.

    अहमदनगर : शनिशिंगणापूर (Shanishinganapur)

    येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी आता इतर काही देवस्थानच्या सशुल्क पासप्रमाणे ५०० रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे. या निर्णयाला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा आक्षेप घेतला आहे.

    हा निर्णय गरीब आणि श्रीमंत भक्तांमध्ये भेदभाव करणारा आहे. या निर्णयाला आमचा विरोध असून हा निर्णय विश्वस्त मंडळाने मागे घ्यावा अन्यथा भूमाता ब्रिगेड आवाज उठवणार असल्याचा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

    शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. या विरोधात काही वर्षांपूर्वी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर हा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला. मात्र, काही काळातच सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांनाच चौथऱ्यावर प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर करोनाकाळात मंदिर बंद होते. ते सुरू झाल्यानंतर चौथरा खुला करण्याची मागणी होत होती. त्यामुळे देवस्थानने तो खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. पाचशे रुपयांची देणगी पावती घेणाऱ्या सर्व महिला किंवा पुरुषांना चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करता येईल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.