bigg boss press conference

‘बिग बॅास’ मराठीच्या घरी चक्क पत्रकार परिषद (Bigg Boss Marathi 3 Press Conference) रंगली. या निमित्तानं महाराष्ट्राचं आघाडीचं दैनिक म्हणून नावारूपाला येत असलेलं दैनिक ‘नवराष्ट्र’ (Navarashtra) ही ‘बिग बॅास’मराठीच्या घरी पोहोचलं.

  कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर सुरू असलेला ‘बिग बॅास’ मराठी (Bigg Boss Marathi 3) हा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ‘बिग बॅास’ मराठीच्या ग्रँड फिनालेला (Bigg Boss Marathi Grand Finale ) काही दिवस उरले असताना घरातील सदस्यांना एक आश्चर्याचा धक्का देण्यात आला. बिग बॅासच्या आदेशावरून काही निवडक पत्रकारांची घरात एंट्री झाली आणि ‘बिग बॅास’ मराठीच्या घरी चक्क पत्रकार परिषद (Bigg Boss Marathi Press Conference) रंगली. या निमित्तानं महाराष्ट्राचं आघाडीचं दैनिक म्हणून नावारूपाला येत असलेलं दैनिक ‘नवराष्ट्र’ही ‘बिग बॅास’मराठीच्या घरी पोहोचलं.

  ‘बिग बॅास’ मराठीच्या घरातील ९१ वा दिवस… रविवार १९ डिसेंबर… शनिवारी सोनाली पाटीलची गच्छंती झाल्यानं घरात आता केवळ सहाच सदस्य उरले आहेत. यात मीरा जगन्नाथ, मीनल शाह, विकास पाटील, डॅा. उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि विशाल निकम यांचा समावेश आहे. यापैकी विशालला महेश मांजरेकरांकडून अगोदरच टिकिट टू फिनाले मिळाल्यानं तो सेफ झाला आहे. विशाल थेट फिनालेमध्ये पोहोचला आहे, मात्र इतर पाच जणांच्या मनात धाकधूक कायम आहे.

  याच वातावरणात पत्रकारांची टिम जेव्हा ‘बिग बॅास’ मराठीच्या घरी पोहोचली, तेव्हा सर्व सदस्य घराच्या आत आपापल्या कामांमध्ये व्यग्र होते. घर आणि मुख्य दरवाजामधील एरियामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिग बॅासच्या टिमनं सदस्यांना पत्रकार आल्याची वर्दी दिल्यानंतर काही वेळानं हळूहळू घराचे पडदे उघडले गेले. सर्वांना पाहून सदस्य खूपच खुश झाले. सदस्यांसाठी व्यवस्थित मांडलेल्या सहा खुर्च्यांवर विशाल, विकास, उत्कर्ष, मीरा आणि मीनल विराजमान झाले आणि त्यानंतर सुरू झाला प्रश्नोत्तरांचा तास… जो तासाच्याही पलीकडे जात जवळपास दोन ते अडीच तासांपर्यंत रंगला. या दरम्यान सर्व सदस्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. खेळाच्या या अखेरच्या टप्प्यावर मनातील किल्मिषं दूर करत कुणी सॅारी म्हटलं, तर कुणी मैत्रीचं नातं दृढ केलं… कुणी आपण त्यावेळी असं का वागलो याचा खुलासा केला, तर कुणी आपल्या आवडत्या सदस्याची आठवण सांगितलं. एकूणच घरातील सदस्यांसाठी ते वातावरण स्मरणीय असंच होतं…

  विशालचं माऊलीप्रेम
  आज अखेरच्या टप्प्यावर घरातील कोणत्या सदस्याची प्रकर्षानं आठवण होतेय ? या प्रश्नाचं उत्तर देताना विशालनं लगेच मला माऊलींची खूप आठवण येत असल्याचं सांगितलं. माऊली म्हणजेच महिला किर्तनकार शिवलीला पाटील. माऊलींनी माझ्या आयुष्याला नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. वारकरी संप्रदायाचा पाईक असल्यानं माऊलींची शिकवण खूप महत्त्वाची वाटत असल्याची भावना विशालनं व्यक्त केली. घरातून बाहेर पडल्यावर माऊलींची भेट घेणार असल्याचंही विशाल म्हणाला. मीरानं तृप्ती देसाईंचं नाव घेतलं. उत्कर्षनं तृप्ती, सुरेखा, स्नेहा, गायत्री या चौघांची नावं घेतली, तर जयनं तृप्ती आाणि स्नेहा यांचा उल्लेख केला. विकास आणि मीनल यांनीही आपल्या आवडत्या सदस्यांची नावं घेतली जी शोमध्ये समजतील.

  सर्वांची मेहनत
  खूप छान खेळल्यानं आणि मेहनत घेतल्यानंच सर्वजण इथवर पोहोचल्याचं मीनलसह सर्वांनी मान्य केलं. मीनल म्हणाली की, प्रत्येकानं खूप मेहनत केली आहे. टास्कमध्ये, रिलेशनमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये सर्वांनी खूप मेहनत घेतल्यानं आज सर्वजण इथ रहणं डिझर्व्ह करत आहेत. यावर विकास म्हणाला की, मीनल असं बोलली असेल की विकास खेळात कुठेतरी कमी पडला. तो आपल्या ग्रुपमुळं किंवा माझ्यामुळं इथपर्यंत पोहोचला, पण मी आज पुन्हा मी तेच उत्तर देतोय. माझा खेळ महाराष्ट्राची जनता आजवर बघत आलीय. या घरात मीच सर्वात जास्त नॅामिनेट झालोय. प्रत्येक आठवड्यात मला प्रेक्षकांनी सेव्ह केलंय म्हणून मी आजही मी या घरात आहे. यावर मीननल म्हणाली की, विकास आणि मी इतक्या दिवसांपासून एकत्र आहे, पण लास्ट विकमध्ये आमच्यात जे भांडण झालं त्यामुळं ही सर्व स्टेटमेंट्स आली आहेत. पण आम्ही सर्वांनीच खूप मेहनत केल्यानं इथं पोहोचलोय हे सर्वांना माहित आहे.


  डॉक्टरचा टास्क आणि गाणं
  बऱ्याच टास्कमध्ये जिथं जिथं टीमसाठी खेळायचं होतं, पण कुठेतरी अनफेअर होतोय त्या सगळ्याच टास्कमध्ये मला फील झालंय. मी जेव्हा कॅप्टन होतो तेव्हाही त्याची जाणीव झाली. त्यामुळंच माझा गेम सुधारत गेला. त्याच कारणामुळं आज मी इथं आहे. ‘बिग बॅास’ घरी उत्कर्षनं रचलेली शेतकऱ्यांवरची कविता चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यानंतर घरी आलेल्या पत्रकारांचं स्वागत आाणि कार्याचा गौरव उत्कर्षनं आपल्या गाण्याद्वारे केलं. ‘शेतकऱ्यांचे, मोलकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे तुम्ही आवाज झाला साऱ्यांचे, तुम्ही आधारस्तंभ चौथे भारताचे…’ याशिवाय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीच्या आग्रहाखातर त्यानं एक हिंदी गाणंही गायलं.

  टिकीट टू फिनाले
  टिकीट टू फिनालेचं श्रेय आमच्या टिममधील सर्व सदस्यांना शंभर टक्के देणार. कारण आमच्या टिममध्ये जे बाँडींग होतं, जे इमोशन होतं त्यामुळंच मी इथवर पोहोचलोय. माझ्या टिम बी मधून मला पॅाझिटीव्हीटी मिळाली. ए टीमबरोबर जास्त वाद न होता बी टिमसोबतच जास्त वाद होण्याबाबत विशाल म्हणाला की, आमच्या चौघांमध्ये प्रत्येकाचं वैयक्तीक मत होतं. स्वत:चं मत असल्यानं प्रत्येकजण आपलं मत मांडत असतो. ते मांडणं गरजेचंही असतं. त्यामुळंच आमचे खटके उडाले असतील. त्यानंतर पॅचअपही झालं. त्यामुळं मनात कोणाबाबतही राग नव्हता.

  जयचा गेमप्लॅन
  दुसऱ्यांचा गेम करता करता स्वत:चा गेम विसरल्याबाबत नकार देत जय म्हणाला की, मी माझा गेम विसरलो असं कुठेही वाटत नाही. कारण आतापर्यंत अशी कोणतीही सिच्युएशन आली नाही. एक आठवडा होता, जो स्नेहाचा आठवडा होता. त्यामुळं मी माझा गेम विसरलोय असं वाटत नाही. जसं मी तेव्हा डॅाक्टरलाही सांगायचो की, जर स्नेहाच्या ऐवजी तू समोरून चालत आला असता आणि तू जर मला असं बोलला असता तर तिच्यापेक्षा जास्त मी रिॲक्ट झालो असतो. कारण आपलं जर कोणासोबत नातं जुळतं, तर त्यात काही चुकीचं इंटेंशन नव्हतं. घरात माझे बऱ्याच लोकांसोबत खटके उडाले असून, भांडणही झालं आहे, पण मला त्याचा काही फरक पडत नाही. अर्थातच हा वैयक्तीक गेम असून, इथं एकच व्यक्ती जिंकणार आहे. त्यामुळं माझ्याही काही स्ट्रॅटेजीज होत्या. ते मी ॲक्सेप्टही करतो. काही गोष्टी आपण करतो त्या ॲक्सेक्ट करणंही खूप महत्त्वाचं असतं. मी माझ्या स्वत:साठी खेळत होतो. दुसऱ्यांसाठी कधी खेळतच नव्हतो हे मी मान्य करतो.

  मीरा-गायत्रीची मैत्री
  एक मैत्रीण असूनही गायत्री दातार जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा तिला सॅारी न म्हणण्याबाबत मीरानं खुलासा केला. गायत्रीशी आपली मैत्री घरात आल्यावरच झाल्याचं मीरा म्हणाली. पहिल्यांदा इथंच आमची ओळख झाली. इथं सर्वचजण गेमसाठी आले आहेत आणि नंतर बाकीचे रिलेशन्स बनवण्यासाठी आलेत. मला माझ्या गेमवर फोकस करायचा होता, जो मी केला. आमची मैत्री वाचवण्यासाठी मी तीन वेळा प्रयत्न केला होता, पण ते वर्क झालं नाही. मी कोणावरही जबरदस्तीनं मैत्री लादू शकत नाही. ये आणि माझ्याशी बोल असं मी सांगू शकत नाही. अर्थातच घराबाहेर गेल्यावर नक्कीच त्या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल.

  मीनल का भांडली ?
  मी नेहमीच टास्क खेळताना भांडले आहे. माझ्या अपोनंटसोबत भांडलेय. माझ्या टीममधील लोकांसोबत कधीच भांडले नाही. कॅमेरा आहे म्हणून असंच वागायचं असं मी काहीही ठरवलेलं नाही. जनरली मला फेक वागता येत नाही. जेन्युअनली सांगायचं तर मी माझ्या लोकांसाठी नेहमी उभी राहिलेय. मनापासून उभी राहिलीय. कारण मला खोटं वागता येत नाही. आताही माझं सर्वांशी छान बाँडींग आहे. हेच माझं नेचर आहे. एका रिॲलिटी शो तुम्ही कितपत फेक वागू शकता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अखेरीस हा देखील एक रिॲलिटी शो आहे, ज्यात तुम्ही आहात तसेच दिसताही. मी जितकी भांडते तितकीच जीवही लावते. त्यामुळं मला तुम्ही ओव्हर एक्स्प्रेस होताना बघत असाल.